पारनेर रिपाइं(आठवले गट) यांचे तहसीलदारांना निवेदन

पारनेर/प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन रिपाइं(आठवले गट) तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी तहसीलदार, पारनेर यांना सादर केले आहे. यावेळी रिपाइं नेते संगम सोनवणे, प्रकाश पटेकर, विकास शेलार, प्रदीप नगरे, राजेश साठे, आदी उपस्थित होते. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली असून, त्यांनी बांधकाम सुरू केले आहे. मात्र, वाळूच्या उपलब्धतेअभावी बांधकामात अडचणी येत आहेत.
निवेदनात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्र शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचे धोरण जाहीर केले आहे. तरीही, पारनेर तालुक्यातील अनेक गोरगरीब लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत: सर्व घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करावी, ग्रामपंचायतीमार्फत पारदर्शक वाळू वितरण यंत्रणा उभारावी, वाळू मिळण्यासाठी सुलभ आणि पारदर्शक प्रक्रिया निश्चित करावी, स्वतःची जागा नसलेल्या लाभार्थ्यांना शासनामार्फत जागा उपलब्ध करावी.
तालुका अध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी तहसीलदारांना विनंती केली आहे की, या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी. यामुळे तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे घरकुल बांधकामाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. तहसील प्रशासन या मागण्यांवर काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *