पारनेर : प्रतिनिधी,

       पारनेर शहराच्या विकास आराखड्याच्या मंजुरीवरून राजकीय श्रेयवादाचा नवा अंक सुरू झाला असून, नगरसेवक अशोक चेडे यांनी थेट नाव घेत विरोधकांवर तोफ डागली आहे. “मंत्रालयातून अधिसूचना कोणी आणली, यावर श्रेय ठरत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून विकास आराखड्याचे खरे श्रेय केवळ आमदार काशिनाथ दाते यांचेच आहे. सुजित झावरे पाटील यांचा या आराखड्याशी सबंधच काय?” असा थेट सवाल चेडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

         विकास आराखड्याच्या मंजुरीनंतर काही नगरसेवकांनी फटाके फोडल्याचा उल्लेख करत चेडे यांनी टोला लगावला. “आमच्या नेतृत्वाने मंजूर केलेल्या आराखड्यासाठी विरोधकांनी फटाके फोडायचे कारणच काय? न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,” अशी टीका त्यांनी केली.

      चेडे यांनी विकास आराखड्याचा इतिहास उलगडताना सांगितले की, नगरपंचायत स्थापनेनंतर तत्कालीन आमदार तथा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी या प्रक्रियेला प्रारंभ केला. त्यानंतर तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून आराखड्याला गती मिळाली आणि मसुदा शासनाकडे सादर करण्यात आला.
पुढे विधानसभा निवडणुकीत काशिनाथ दाते विजयी झाल्यानंतर त्यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत मंजुरी मिळवली. “लोकप्रतिनिधी म्हणून ती त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती पार पाडली. त्यामुळे मंजुरीचे खरे श्रेय आमदार दाते यांचेच आहे,” असे चेडे यांनी ठामपणे सांगितले.

        विकास आराखड्याच्या मंजुरीचा मुद्दा आता श्रेयवादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. विकासाच्या कामांपेक्षा “मी केले, मी आणले” या घोषणांवरच भर दिला जात असल्याची खंतही नागरिकांतून व्यक्त होत आहे. चेडे यांच्या या धारदार वक्तव्यामुळे पारनेरच्या राजकारणात नव्या वादळाची चाहूल लागली असून, विकासाच्या नावावर होणाऱ्या श्रेयवादाला आता कोण लगाम लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “मेहनत दुसऱ्याची… आणि मिरवणूक आपली”…

“कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना विकास आराखड्याचे श्रेय घेणे हे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे, पारनेर नगरपंचायतीशी काडीचाही संबंध नसताना फुकटचा बडेजाव मिरवण्यासाठी कागदी घोडे नाचविणे कोणालाही मान्य होणार नाही,”

– अशोक चेडे, नगरसेवक पारनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *