पारनेर / भगवान गायकवाड, 

अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि पर्यायाने आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, असा आक्रमक ठराव पारनेर येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.आरक्षण हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार असून, त्यात फेरबदल करण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा न्यायालयाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला संविधान विरोधी आणि घटनाबाह्य ठरवत, या निर्णयाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी बीड येथून मंत्रालय मुंबईपर्यंत पायी लाँग मार्च’ काढण्यात येत आहे.

हा लॉन्ग मार्च मंगळवार, दिनांक १६ जून रोजी पारनेर तालुक्यातील सुपा येथे पोहोचणार आहे. या मार्चचे आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष, संघटना आणि जनसामान्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जोपर्यंत सरकार उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.या आंदोलनाच्या नियोजनासाठी ‘सर्वसमावेशक अनुसूचित जाती-जमाती एकता समिती’ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या प्रमुखपदी आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब पातारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.लाँग मार्चचे स्वागत आणि त्यानिमित्त होणाऱ्या प्रबोधन संमेलनासाठी तालुक्यातील तमाम संविधान प्रेमी आणि आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीस राजेंद्र करंदीकर, बाळासाहेब पातारे, दादाभाऊ पटेकर, हिरामण सोनवणे, पत्रकार भगवान गायकवाड, किरण सोनवणे, प्रदीप नगरे, योगेश सोनवणे, अमित जाधव, अतुल भालेराव यांच्यासह नगर शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते संजय कांबळे, शिवाजी भोसले, योगेश साठे, महेंद्र बोरुडे, चंद्रकांत गायकवाड, सुरेश जाधव, सतिश सूर्यवंशी, प्रदीप कसबे, सुखदेव थोरात, रामदास कसबे, बाळासाहेब कांबळे, अजय साळवे, सुधीर सोनवणे, धनाजी सूर्यवंशी, संतोष आडसुळ, राहुल घंगाळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *