पारनेर : प्रतिनिधी,
बीतालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी समाजात मोठा जनसंपर्क असलेले एकलव्य युवा फाउंडेशनचे राज्य सचिव तसेच खडकवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. पारनेर येथील खासदार नीलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खासदारांचे बंधू दीपक लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
दत्तात्रय गायकवाड हे गेल्या वीस वर्षांपासून खडकवाडी व उत्तर पारनेर भागात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. आदिवासी समाजासह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे आणि तळागाळातील कार्यामुळे उत्तर भागात त्यांचा प्रभावी संपर्क आहे.
शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांनी तसेच खासदार नीलेश लंके यांच्या विकासाभिमुख कार्याने प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. आदिवासी बांधव व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे प्रमुख अमोल उगले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी संतोष शिंदे, गणेश आग्रे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विशाल गागरे यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी दीपक लंके आणि अमोल उगले यांनी दत्तात्रय गायकवाड यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गायकवाड यांच्या प्रवेशामुळे खडकवाडी व उत्तर पारनेर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून आदिवासी समाजाच्या प्रश्नांना अधिक बळकटीने वाचा फुटेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास जितेश सरडे, बाळासाहेब लंके, संदीप चौधरी, सरपंच अभिजीत झावरे, युवराज पाटील खिलारी यांच्यासह निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




