पारनेर / प्रतिनिधि,
नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग.ज. चितांबर विद्या मंदिरात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. शाळा रांगोळी, फुगे आणि फुलांनी आकर्षकपणे सजवण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली, तसेच त्यांचे औक्षण करून सन्मानाने वर्गात नेण्यात आले.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका विभावरी रोकडे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सदस्या व माजी शिक्षिका देवयानी भोपे आणि माजी विद्यार्थिनी रोहिणी वाघमारे उपस्थित होत्या. व्यासपीठावर पर्यवेक्षिका मंदा शिंदे आणि शिक्षक प्रतिनिधी विनोद गाडगे यांनीही हजेरी लावली.
देवयानी भोपे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर रोहिणी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. मुख्याध्यापिका विभावरी रोकडे यांनी प्रास्ताविक केले आणि उपस्थितांचे स्वागत केले. हा स्वागतोत्सव नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.






