पारनेर / ता. प्रतिनिधी,  

पारनेर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनी राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीदरम्यान पारनेर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांची वस्तुस्थिती मांडत ग्रामीण भागातील पशुधन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने पदभरती करण्याची आग्रही मागणी केली. या मागणीची गांभीर्याने दखल घेत ना. पंकजाताई मुंडे यांनी संबंधित रिक्त पदांवर लवकरात लवकर नियुक्त्या करण्याचे आश्वासन दिले.

पारनेर तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण आधार असलेल्या पशुपालन व्यवसायाला बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे सक्षम मनुष्यबळ अत्यावश्यक आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे पशुधनाची आरोग्य तपासणी, वेळेवर उपचार, लसीकरण तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आमदार काशिनाथ दाते सर यांनी हा प्रश्न थेट मंत्रिमहोदयांसमोर मांडत शेतकरी व पशुपालकांच्या हितासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली.

पारनेर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात एकूण ५६ पदे मंजूर असून, त्यापैकी केवळ २३ पदे भरलेली आहेत, तर तब्बल ३३ पदे रिक्त आहेत. म्हणजेच मंजूर पदांपैकी सुमारे ५९ टक्के पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. यामध्ये सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या दोनही मंजूर जागा रिक्त असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची १६ पैकी ११ पदे रिक्त आहेत. पशुधन विकास अधिकारी गट-ब या पदाची एक जागा, पशुधन पर्यवेक्षक/सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १६ पैकी १० पदे आणि परिचरांची १६ पैकी ९ पदे रिक्त आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना वेळेत सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ वाढविणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

या भेटीप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक तथा पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत गायकवाड आणि पारनेर शहराचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता शेठ कुलट हे ही उपस्थित होते. पारनेर तालुक्यातील पशुपालकांना अधिक सक्षम, तत्पर आणि प्रभावी पशुधन आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने आमदार काशिनाथ दाते सर यांनी केलेला हा पाठपुरावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे ही केवळ प्रशासकीय बाब नसून, ती ग्रामीण भागातील पशुपालकांच्या दैनंदिन गरजा, पशुधनाचे आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याशी निगडित असल्याने रिक्त पदभरतीचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. पारनेर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न शासनस्तरावर मांडला असून, मंत्र्यांनी दिलेल्या विश्वासामुळे पदभरतीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

– आ. काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 रिक्त पदांबाबत आ. दाते सरांनी बोलण झालं होतं, “रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, हा विश्वास दिलासादायक आहे. पदभरतीमुळे पशुपालकांना वेळेत व दर्जेदार पशुधन आरोग्य सेवा देणे शक्य होईल.”

– डॉ. नितीन गाडीलकर
तालुका पशुसंवर्धन अधिकारी, पारनेर (प्रभारी)

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “रिक्त पदे भरल्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे कामकाज अधिक सक्षम होईल. यामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा व शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे देता येईल.” आ. दाते सरांचे सहकार्याने होत आहे.

– डॉ. अरविंद रेपाळे
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (प्रभारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *