पारनेर I प्रतिनिधी,
पारनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून पारनेरचा विकास आराखडा (DPR) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून घेतल्यानंतर तातडीने ६ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. केवळ निधी मंजूर करून न थांबता प्रत्यक्षात विकासकामांना सुरुवात झाली असून, या कामांची पाहणी करताना पारनेरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भविष्यातही असाच भरीव निधी आणू, असा विश्वास सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केला.
पारनेर शहराच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यामध्ये शहरांतर्गत दशक्रिया विधी परिसराचे काँक्रीटीकरण, ७५ लाख रुपये खर्चाचे पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) आणि १ कोटी रुपयांचे दशक्रिया विधीकडे जाणाऱ्या रस्तासाठी ५०.०० लक्ष तसेच दशक्रिया विधी वाहन पार्किंगसाठी ५०.०० लक्ष या प्रमुख कामांचा समावेश आहे. सुजित झावरे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या सुरु असलेल्या सर्व विकासकामांची पाहणी केली आणि कामाचा दर्जा व गतीबाबत समाधान व्यक्त केले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
प्रति काशी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विशेष संकल्प!….
भविष्यात पारनेर शहर पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासोबतच शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मुख्य चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ‘प्रति काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारनेरमधील बारा ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक महत्त्व आणि पाराशर ऋषींच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने विशेष चौक विकसित करून त्यांचे भव्य सुशोभीकरण केले जाईल, असे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.




