खातगाव टाकळी येथे सभामंडप लोकार्पण
पारनेर / ता. प्रतिनिधी,
धार्मिक श्रद्धा आणि विकासकामांचा सुंदर संगम घडवत तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत खातगाव टाकळी येथील गोरक्षनाथ मंदिराच्या २५ लक्ष रुपये निधीतून सभामंडपाचे लोकार्पण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सभामंडपामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, प्रवचन तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी ग्रामस्थांना चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.
यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले, “देवस्थान ही आपल्या श्रद्धेची केंद्रे असण्याबरोबरच गावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. गोरक्षनाथ मंदिराच्या सभामंडपामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची गरज पूर्ण झाली आहे. या परिसरातील धार्मिक परंपरा जपत विकासकामांना चालना देणे, हीच आपली भूमिका आहे.”
“मतदारसंघाचा विकास हा केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता प्रत्येक गावाच्या गरजेनुसार झाला पाहिजे. रस्ते, पाणी, सिंचन, मंदिर परिसर, सभामंडप, मूलभूत सुविधा अशा विविध कामांना शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत आधार मिळावा, यासाठी उपसा सिंचन योजनांसह मोठ्या जलप्रकल्पांच्या पाठपुराव्यालाही प्राधान्य दिले जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “विकासकामे करताना गावागावातील नागरिकांच्या मागण्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेतल्या जात आहेत. धार्मिक स्थळांचा विकास असो, ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न असो किंवा सिंचन व पाणीप्रश्न—प्रत्येक विषय शासनदरबारी मांडून तो मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. भविष्यातही खातगाव टाकळीसह संपूर्ण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
मतदारसंघात रस्ते व दळणवळणाची कामे, विविध देवस्थानांच्या सभामंडपांची कामे, मंदिर परिसर सुशोभीकरण, पाणी व सिंचनाशी संबंधित प्रकल्प तसेच गावनिहाय मूलभूत सुविधांची कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला अधिक व्यापक स्वरूप मिळत असून, स्थानिक नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यावेळी बापु सोनवणे, सरपंच सौ. रुथा वैराळ, उपसरपंच धीरज कुलट, ह.भ.प. आदिनाथ कुलट गुरुजी, ह.भ.प. सर्जेराव जपे गुरुजी, मिटूशेठ कुलट, ज्ञानेश्वर पठारे, नवनाथ ताकपेरे, उत्तमराव कुलट, सुदर्शन कुलट, सुनील कुलट, सोपान पठारे, अतुल कुलट, अमित सातपुते, रमेश कुलट, बबन सातपुते, आबासाहेब कुलट, रंगनाथ कुलट, छबुराव काडेकर, श्रीकांत कर्डिले साहेब आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




