शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा


पळशी | प्रतिनिधी,

प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पळशी येथील श्री राही-रुक्मिणी देवस्थानात आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आपल्या धर्मपत्नीसमवेत श्री विठ्ठल-राही-रुक्मिणीची विधिवत महापूजा करून विठुरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल व राही-रुक्मिणी मातेच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घालून आकर्षक वस्त्रालंकार व पुष्पहारांनी अलंकृत करण्यात आले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात, मंत्रोच्चार आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात महापूजा संपन्न झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.

महापूजेनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसरात हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन आणि वारकरी संप्रदायाच्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वारकरी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.


आषाढी एकादशीच्या निमित्ताने पळशीतील श्री राही-रुक्मिणी देवस्थानात भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिर परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला आणि भाविकांनी “ज्ञानोबा-तुकोबा” व “पांडुरंग हरी”च्या जयघोषात एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा केला.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
 “पळशीचे हे प्रतिपंढरपूर क्षेत्र हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी एकादशीच्या या पवित्र पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी संपूर्ण परिसराच्या सुख-समृद्धीसाठी, सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि बळीराजाच्या शेतात भरघोस पीक-पाणी लाभावे, अशी प्रार्थना केली आहे.”
– सुजित झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद) 
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *