पळशी विकासकामांसाठी ३२५ लाख रुपयांचा निधी
पारनेर / ता. प्रतिनिधी,
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या विशेष प्रयत्नातून पळशी गावासाठी मंजूर झालेल्या एकूण ३२५ लाख रुपयांच्या दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार दाते यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पळशी–वनकुटे रस्ता (प्रजिमा-२४) कि.मी. ३६/७०० येथे पोहोचमार्गासह लहान पुलाच्या बांधकामासाठी ३०० लाख रुपये, तर श्री विठ्ठल मंदिर देवस्थान पळशी येथे भक्तनिवास बांधण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विधानसभा सदस्य झाल्यापासून पळशी गावात आजवर जवळपास सव्वापाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे आ. दातेंनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार दाते सर म्हणाले, श्री विठ्ठल मंदिर देवस्थान भक्तनिवासासाठी ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत संबंधित कामाचे भूमिपूजन होत आहे, ही त्या विठ्ठलाचीच कृपा आहे. यापुढील काळातही देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. पळशी–वनकुटे रस्त्यावरील पुलाची गरज आणि या भागातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन संधी मिळताच हे काम मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या राजकीय वाटचालीविषयी बोलताना आमदार दाते सर यांनी कै. आ. वसंतराव झावरे (दादा) यांच्यासोबतच्या जुन्या सहकार्याच्या आठवणींना उजाळा दिला. “मी साधारणतः २५ वर्षांचा असल्यापासून वसंतराव दादांसोबत काम केले आहे. त्यांच्या सर्वसमावेशक सामाजिक आणि राजकीय वाटचालीतून मला खूप काही शिकायला मिळाले. आज कुणी कितीही आपणच दादांचे वारसदार असल्याचे सांगत असले, तरी केवळ बोलून वारसदार होता येत नाही. दादांच्या विचारांशी प्रतारणा करणारा त्यांचा खरा वारसदार होऊच शकत नाही. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून राजकीय वाटचाल करत मी माझ्या कृतीतून ते सिद्ध केले आहे.”
मतदारसंघातील विकासकामांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार दाते सर म्हणाले की, कोणत्या गावातून विधानसभा निवडणुकीत किती मतदान झाले, याचा विचार करून मी विकासकामे करत नाही. एखाद्या गावात मतदान कमी झाले असेल, तरी त्या गावातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन काम करणे ही माझी भूमिका आहे. विरोध करणारेही योग्य भूमिका आणि कामाच्या माध्यमातून समर्थन देऊ लागतात यावर माझा विश्वास आहे. प्रत्येकाच्या भूमिका बदलत असतात. त्यामुळे राजकारणापेक्षा जनहिताला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.
या भागातील विविध जाती-धर्मांतील नागरिकांशी गेल्या ४० वर्षांपासून आपले ऋणानुबंध आहेत. याचं गटातील कन्हेर गाव ही आपली जन्मभूमी असून पारनेर शहर ही आपली कर्मभूमी आहे. जन्मभूमी आणि कर्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी सातत्याने काम करत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. विधानसभा निवडणुकीत अनेक गावांतील प्रमुख कार्यकर्ते विरोधात असतानाही चार दशकांच्या सामाजिक संबंधांमुळे सर्वसामान्य जनतेने अत्यंत चुरशीच्या लढतीत आपल्याला भरभरून साथ दिली. या विश्वासाची परतफेड समाजहिताची विकासकामे करून करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असेल.
या भूमिपूजन सोहळ्यास तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, माजी जिल्हा बँक संचालक प्रशांत दादा गायकवाड, बाबासाहेब खिलारी, संदीप रोहोकले, सुभाष दुधाडे, पोपटराव चौधरी, डॉ. नितीन रांधवण, प्रकाश रोहोकले, देवीदास फलके, प्रवीण फलके, अशोक कावरे, सुभाष गांधी, मिठु जाधव, भास्कर शिंदे, विकास रोकडे, अमोल रोकडे, गणेश शिंदे, गणेश हाके, सुभाष राठोड, संतोष जाधव, आप्पा शिंदे, नंदु साळवे, बाबासाहेब गागरे, छबु शिंदे, अंबरनाथ वाळुंज, इंद्रभान ढोकळे, प्रसाद कर्नावट, दिपक भागवत, गुलाब केसकर, विश्वनाथ शिंदे, राहुल सुडके, संपत जाधव यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




