नेवासा / भगवान गायकवाड, 
जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महसूल विभाग वगळता इतर कोणत्याही खात्याचे अधिकारी उपस्थित नसल्याने, संतापलेल्या सदस्यांनी चक्क जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध केला.

नेवासा येथे १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नियमानुसार, या कार्यक्रमाच्या १५ दिवस आधी जिल्हाधिकारी आणि पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक संघटनांची संयुक्त बैठक होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा प्रकारची कोणतीही बैठक न घेता, अचानक कार्यक्रम जाहीर करण्याची पद्धत पडली आहे. सदस्यांना विश्वासात न घेता केल्या जाणाऱ्या या नियोजनामुळे ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे.

या कार्यक्रमास वीज वितरण, कृषी, आरोग्य, एसटी महामंडळ, बँका, भूमी अभिलेख यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या प्रमुखांनी उपस्थित राहणे बंधनकारक होते. ग्राहकांच्या थेट तक्रारींचे निवारण होण्यासाठी ही उपस्थिती महत्त्वाची असते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही अनेक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. “अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत आहेत,” अशी खंत सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी जमिनीवर बसून आपला निषेध नोंदवला. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराबाबत लवकरच ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे सदस्यांनी जाहीर केले.
या प्रसंगी मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष विलास जगदाळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी, प्रांताचे सदस्य अतुल कुराडे, सचिव दिनेश थोरात, महिला अध्यक्षा अमिता कोहली, नगराध्यक्ष डॉ. वीरेंद्र घुले, परिषद सदस्य अशोक शेवाळे, श्रीमती उमा मेहत्रे, श्री. हरिभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष डॉ. रजनीकांत पुंड, रामकृष्ण थोटे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक दरमहा अपेक्षित असताना विविध कारणे सांगून ती पुढे ढकलली जाते..आचारसंहितेचे कारण सांगून ग्राहकांचे प्रश्न प्रलंबित ठेवले जातात. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सामान्य ग्राहकाने न्याय मागायचा कुणाकडे? 
 – डॉ. विरेंद्र घुले, नगराध्यक्ष, नेवासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *