विकास आराखड्याला (DPR) मंजुरी श्रेयवादावरून राजकीय खळबळ; सुजित झावरे पाटील यांची आमदार काशिनाथ दाते यांच्यावर जोरदार टीका
पारनेर/ प्रतिनिधी,
पारनेर नगरपंचायतीच्या वतीने पारनेर शहराच्या विकास आराखड्याला (DPR) मंजुरी मिळवून दिल्याबद्दल शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना झावरे पाटील यांनी तालुक्यातील श्रेयवादाच्या मुद्द्यावरून आमदार काशिनाथ दाते यांच्यावर (नाव न घेता) तीव्र टीका केली. त्यांनी “ज्याने काम केले, त्याला श्रेय मिळालेच पाहिजे” असे सांगत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्याचा दावा केला.
कार्यक्रमात नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, शिवसेना तालुकाप्रमुख अरुणराव ठाणगे, ज्येष्ठ नेते खंडू भुकण, डॉ. बाळासाहेब कावरे, सतीश भालेकर, रवींद्र गायखे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख डॉ. कोमल भंडारी आदी उपस्थित होते.
झावरे पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर प्रवेश सोहळ्यात DPR मंजुरीचे आश्वासन दिले होते. आचारसंहितेमुळे विलंब झाला, पण मी पाठपुरावा करून फाईल मार्गी लावली. सोशल मीडियावर PDF टाकली तर आमदारांच्या पोटात गोळा आला. त्यांना DPR मंजुरीचा आनंद नाही, तर सुजित झावरे यांनी केल्याचे दुःख आहे.”
ते पुढे म्हणाले, “ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही, त्यांना अजित पवार आणि सुजय विखे यांच्या सांगण्यावरून आम्ही मदत करून आमदार केले. आज तेच उपकार विसरले आहेत.” आमदार दाते यांचा उल्लेख ‘गोड बोलणारा पण मनात विष असलेला माणूस’ असा करत त्यांनी संताप व्यक्त केला. “निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य नसलेल्या माझ्या पाया पडायला हे येत होते. विधानसभा निवडणुकीत १०-१५ गावांत बुथ लावायला माणसे नव्हती, त्यांची व्यवस्था आम्ही केली. आम्ही एका विषारी झाडाला पाणी घातले, याची खंत वाटते,” असे ते म्हणाले.
पारनेरच्या पाणी योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, DPR मंजूर नसल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. आता मार्ग मोकळा झाला असून, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना लवकर कार्यान्वित होईल.
माजी नगराध्यक्ष अशोक चेडे यांच्यावरही टीका करताना झावरे म्हणाले, “चेडे यांना DPR चा लॉंग फॉर्म तरी माहिती आहे का? कोरोना काळात चढ्या भावाने माल विकणाऱ्या वृत्तीचा वापर करून आमदार आपली पोळी भाजून घेत आहेत. येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत जनताच चोख उत्तर देईल.”
माजी आमदार विजय औटी यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, औटी यांनी कधी खालच्या पातळीवर टीका केली नाही किंवा दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेतले नाही.
या सत्कार कार्यक्रमात महायुतीचे कार्यकर्ते आणि सत्ताधारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. झावरे पाटील यांच्या आक्रमक भाष्यामुळे पारनेरच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हे वादग्रस्त वक्तव्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण ठरू शकते.




