आमदार काशिनाथ दाते सरांचा नगरसेवकांकडून सत्कार
पारनेर / ता. प्रतिनिधी
पारनेर शहर विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर नगरपंचायतमधील महायुतीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या वतीने पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा आराखडा मंजूर झाल्याबद्दल हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे यांनी विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी आमदार दाते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा सविस्तर लेखाजोखा मांडला. “आमदार दाते यांनी पदभार स्वीकारला तेव्हा संबंधित प्रस्ताव पुणे येथे प्रलंबित होता. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून तो प्रस्ताव मुंबईतील संबंधित विभागापर्यंत पोहोचवला. मंजुरीपर्यंत जवळपास बारा बैठका घेण्यात आल्या. या प्रक्रियेची यत्किंचितही कल्पना नसताना काही जण श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, तो हास्यास्पद आहे. मतदारसंघाचे आमदार या नात्याने शहर विकास आराखड्याच्या मंजुरीचे खरे श्रेय आमदार काशिनाथ दाते सरांनाच आहे,” असे ठाम मत चेडे यांनी व्यक्त केले.
यावेळी वसंतराव चेडे यांच्यासह अशोक चेडे, युवराज पठारे, देवराम ठुबे, कांतिलाल ठाणगे, दिलीप दाते, राजू औटी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता औटी, शांताराम तराळ, सुनील गाडगे, दिगंबर पुजारी, ज्ञानेश्वर औटी, तुषार औटी, नियाज राजे, विठ्ठल कावरे, सीताराम बुगे, गोरख शिंदे, भाऊसाहेब घोडके, पोपट घोडके, भास्कर घोडके, बाळासाहेब घोडके, प्रभाकर घोडके, काका घोडके, भरत औटी माजी, नगराध्यक्ष संतोष घोडके, संपत घोडके, अशोक जाधव, भाऊ घोडके, अजिंक्य घोडके, भास्कर बजाबा औटी, भीमा औटी, बाळू औटी, काशिनाथ औटी सर, बाळू ठाणगे, प्रकाश ठाणगे, रोहित तराळ आदी मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी शहर विकास आराखड्यामुळे पारनेरच्या नियोजनबद्ध विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
🔶🔶🔶🔶🔶🔶
नगरपंचायत स्थापन होऊन दहा वर्षे झाली असली तरी शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असलेला विकास आराखडा प्रलंबित होता. शहरातील रहदारी, व्यापारी क्षेत्र, रस्त्यांची आखणी, शासकीय कार्यालयांची जागा यांसारख्या महत्त्वाच्या बाबींसाठी आराखडा गरजेचा होता. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. आमदार दाते सरांनी शहर विकासासाठी कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळवून अनेक कामे मार्गी लावली असून भविष्यातही शहराच्या वैभवात भर घालणारी कामे होतील.
– नगरसेवक युवराज पठारे




