पारनेर | ता. प्रतिनिधी,
दुष्काळी पारनेरच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नाला निर्णायक दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, डिंबे–माणिकडोह धरणांना जोडणाऱ्या सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याला मंजुरी मिळाली आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ₹५,७०४.५० कोटींच्या सुधारित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी स्वागत करत, हा निर्णय पारनेरच्या कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करताना पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार दाते सर यांनी व्यक्त केली. साकळाई योजनेनंतर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याचा निर्णय झाल्याने पारनेर तालुक्यातील प्रस्तावित उपसा सिंचन योजनांनाही भविष्यात गती मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डिंबे धरणातील पावसाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात वळविण्याची संकल्पना आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर होऊन कुकडी डावा कालवा व त्याखालील लाभक्षेत्रातील शेतीला त्याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे पारनेर तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रातील २२ हून अधिक गावांसह अहिल्यानगर दक्षिण, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कुकडी प्रकल्पातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्गही या निर्णयामुळे अधिक बळकट होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार दाते सर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानत अभिनंदन केले.
🔸 “पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देणे हा अनेक वर्षांचा प्रश्न आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून ते दुष्काळी भागाकडे वळविण्याच्या दृष्टीने डिंबे–माणिकडोह बोगदा अत्यंत महत्त्वाचा आहे.” साकळाई योजनेनंतर पारनेर तालुक्यातील पाच उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणास मान्यता व आज रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. तर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याला मिळालेली मंजुरी ही या प्रयत्नांना अधिक व्यापक दिशा देणारी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढील टप्प्यात कुकडीचे पाणी पारनेरच्या दुष्काळी भागाच्या जास्तीत जास्त शिवारात पोहोचविण्याच्या दिशेने पाठपुरावा सुरूच राहील. शेतकऱ्यांच्या शाश्वत सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणे, हाच आपल्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे,”
– आमदार काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)




