पारनेर : प्रतिनिधी,
पारनेर ग्रामीण पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २६/०९/२०२६ रोजी संस्थापक चेअरमन तथा पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली मनकर्णिका लॉन्स, पारनेर येथे संपन्न झाली. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे सर, संचालक बाळासाहेब सोबले, रखमाजी कापसे सर, लक्ष्मण डेरे, मयूर गांधी, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, कृष्णा उमाप, सुभाष राठोड, दिलीप दाते, सुनील गाडगे, सौ. सुंदा दाते व सौ. आशा तराळ तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, शिक्षण महर्षी डॉ. वाय. पाटील व अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त एसीपी डॉ. सिताराम कोल्हे, ए.टी.सी.सी. बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, मा. जि.प. सदस्य वसंतराव चेडे, मा उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, मा. संचालक विठ्ठलराव औटी, मा. सरपंच जयसिंग मापारी यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्यानंतर संस्थेला सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ३ कोटी ३ लाख १२ हजार ६१७ निव्वळ नफा व ऑडिट वर्ग अ मिळाल्याबद्दल मा. चेअरमन काशिनाथ दाते सर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले.
संस्थेची बँक गुंतवणूक १०४ कोटी असून, स्थावर मालमत्ता ३ कोटी ५४ लाख आहे. संस्थेमार्फत सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभासदांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व व्यवसायासाठी १७५ कोटी रुपये कर्ज वितरित केले आहे.
संस्थेचे अहिल्यानगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असून संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, बेलवंडीफाटा, जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा, सुपा, कामोठे, अहिल्यानगर, वनकुटे, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा १७ शाखा सुरू आहेत, संस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते यांनी सांगितले.
संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, कामोठे, खडकवाडी, आळेफाटा, शिरूर व सुपा येथे स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, सुपा, बेलवंडीफाटा, जामगाव, ढवळपुरी येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. व सभा खेळीमेळीत संपन्न झाली. सभेचे सूत्रसंचालन रखमाजी कापसे सर यांनी केले. व्हाईस चेअरमन सुरेश बोरुडे सर यांनी आभार मानले. यावेळी सभासद व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या सभासदांना संस्थेमार्फत मिष्टान्न भोजन सभा संपल्यानंतर देण्यात आले.
🔸 संस्थेचे २३ वर्षांच्या कालावधीत मार्च २०२६ अखेर २५१ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. हे सभासदांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. संस्थेच्या ठेवी मार्च २०२७ अखेर ३०० कोटींचा टप्पा पार करणार असल्याचा विश्वास आहे.
– सुरेश बोरुडे सर, व्हा. चेअरमन




