पारनेर / ता. प्रतिनिधी,  

राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट दुग्धजन्य पदार्थ, गुटखा, तंबाखू आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्य वस्तूंविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू होती. मात्र, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी “तुकाराम मुंढे यांची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही” अशी स्पष्ट ग्वाही दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

पावसाळी अधिवेशन २०२६ दरम्यान आमदार काशिनाथ दाते यांनी राज्यातील वाढत्या भेसळीच्या प्रकारांकडे सरकारचे लक्ष वेधले. मे आणि जून महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर टाकलेल्या धाडीत भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, पेढा, गुळ, चहा पावडर, आंबा पिकविण्याची पावडर, गुटखा, तंबाखू, सुगंधी सुपारी, मावा तसेच इतर निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. तसेच अशा कारवायांमुळे विभागाचा दबदबा वाढला असून राज्यातील भेसळ माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आमदार दाते यांनी विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक मोहिमेचा उल्लेख करत, ही मोहीम पुढेही सुरू राहणार का आणि आयुक्तांची बदली करण्याचा कोणताही विचार शासनाच्या पातळीवर आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील मोहिमेअंतर्गत राज्यभरातून १,९३० नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच शासकीय व वैद्यकीय संस्थांमध्ये वापरासाठी आणण्यात आलेल्या निर्जंतुक न केलेल्या सर्जिकल साहित्याचा ७४ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. भेसळ रोखण्यासाठी विभागाकडून कठोर कारवाई सुरू असून ती यापुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी “सबंधित आयुक्तांची बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही” असे ठाम विधान केले. त्यामुळे राज्यभरातील नागरिक, ग्राहक संघटना आणि भेसळविरोधी मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या घटकांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.

आमदार काशिनाथ दाते यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधीमुळे केवळ भेसळीचा गंभीर प्रश्न सभागृहात चर्चिला गेला नाही, तर राज्यातील भेसळविरोधी कारवाईचे नेतृत्व करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत शासनाची भूमिका देखील स्पष्ट झाली. त्यामुळे भेसळ माफियांविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे पुढे सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *