पारनेर / ता. प्रतिनिधी,  

बुधवार दि. २४ जुन २०२६
पारनेर शहरातील दशक्रिया विधी घाट शेड बांधकाम व सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन पार पडले असताना, त्याच जागेवर काही व्यक्तींनी पूर्वग्रहदूषित व खोडसाळ हेतूने अवैधरित्या शेड उभारण्याचे काम सुरू केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

विशिष्ट नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत वार्ड क्रमांक ५ मध्ये दशक्रिया घाट शेड व सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपयांचे काम मंजूर झाले असून संबंधित कामाचे भूमिपूजनही विधिवत पार पडले आहे. मात्र त्याच ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना शेड उभारणीचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराला विरोध करणाऱ्या नगरसेवकांचा शेड उभारणीला विरोध नसून, मंजूर विकासकामाच्या जागेवर अतिक्रमण करून ते उभारण्यास त्यांचा आक्षेप आहे.

याबाबत नगरपंचायत प्रशासनात विरोधी बाकावर बसणारे नगरसेवक अशोक फुलाजी चेडे, शालुबाई कांतीलाल ठाणगे, ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, नवनाथ तुकाराम सोबले, निताताई देवराम ठुबे यांसह राष्ट्रवादीचे शहर प्रमुख राजू दत्तात्रय औटी आणि राष्ट्रवादीचे उपशहरप्रमुख सुनील अरुण गाडगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. आपल्या अर्जात त्यांनी दशक्रिया घाटावरील सुरू असलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी करत, संबंधित शेड दुसऱ्या योग्य जागेवर उभारण्यात यावे, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, एका बाजूला शासनाच्या निधीतून शहरासाठी महत्त्वाचे काम मंजूर झालेले असताना त्याच जागेवर घाईघाईने शेड उभारण्यामागे नेमका उद्देश काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करून राजकारण करण्याचा हा प्रकार असल्याची टीकाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आता नगरपंचायत प्रशासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन अतिक्रमण हटविण्याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे. मंजूर विकासकामाच्या जागेचे संरक्षण करून दशक्रिया घाटाचे सुशोभीकरण नियोजित पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ “दशक्रिया घाटावर शेड उभारण्यास आमचा कोणताही विरोध नाही, मात्र शासनाकडून मंजूर झालेल्या ३० लाख रुपयांच्या विकासकामाच्या जागेवर अतिक्रमण करून काम करणे योग्य नाही. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामात अडथळा निर्माण होणार असेल तर त्याची दखल घेणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. आम्ही नगरपंचायत प्रशासनाकडे केवळ नियोजित जागेचे संरक्षण व्हावे आणि मंजूर काम सुरळीतपणे पूर्ण व्हावे, अशीच मागणी केली आहे. नागरिकांच्या हिताच्या विकासकामांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा.” 

– अशोक चेडे, नगरसेवक, पारनेर नगरपंचायत.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ आमचा सबंधित शेड उभारणीला कुठल्याही प्रकारचा विरोध नसून, मंजूर विकासकामाच्या जागेवर अतिक्रमण करून ते उभारण्यास आमचा आक्षेप आहे. ज्यांना कुणाला सबंधित शेड उभारावयाचे आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे दशक्रिया विधी घाटावर भरपूर जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी त्यांनी ते उभारावे, आम्ही त्यांचे स्वागतच करू. 

– ज्ञानेश्वर (माऊली) औटी, सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *