वडगाव सावताळ शिंदेमळा शाळेत चिमुकल्यांचा आनंदी बाजार उत्साहात
पारनेर/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञानदेखील गरजेचे आहे. नफा-तोटा, पैशांचा व्यवहार, ग्राहकांशी बोलणे अशा गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकता येतात. अशा आनंदी बाजारासारख्या उपक्रमांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे चिमुकल्यांमध्ये आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय शेतकऱ्यांच्या कष्टाची आणि पैशाची किंमतही त्यांना कळते. असे मत वडगाव सावताळचे सरपंच संजय रोकडे यांनी व्यक्त केले.
वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत बालचमूंचा ‘आनंदी बाजार’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव सावताळचे सरपंच संजय रोकडे होते.
हा अनोखा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर जाधव यांच्या संकल्पनेतून राबवला गेला. याचे उद्घाटन शिंदेमळा येथील उद्योजक मा. पंढरीशेठ रोकडे यांच्या हस्ते झाले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना गणितीय सराव, नफा-तोट्याच्या संकल्पना, व्यवहारज्ञान, नाणी-नोटांची ओळख आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणे हा होता. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, किराणा, कडधान्य, ओली भेळ, मिठाई, इडली, चहा-कॉफी असे विविध स्टॉल मांडले. ग्राहकांसाठी काही स्टॉलवर फोन-पे सुविधाही उपलब्ध होती.
गावातील महिला, पालक, ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने खरेदी करून उत्साह वाढवला. बाजारातून सुमारे ७-८ हजार रुपयांची उलाढाल झाली.
उद्योजक पंढरीनाथ रोकडे यांनी उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले. तसेच शाळेस १००० लीटर पाण्याची टाकी, प्लंबिंग मटेरियल व सिलिंग फॅन भेट दिले. सरपंच संजय रोकडे यांनी व्यवहारज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला, तर चेअरमन दादाभाऊ रोकडे यांनी सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. उपक्रमाला ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
🔶🔶🔶🔶🔶
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी फक्त पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही. व्यवहारज्ञान, आत्मविश्वास, टीमवर्क आणि सामाजिक जाणीव या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आनंदी बाजारासारखे उपक्रम चिमुकल्यांना खेळता-खेळता शिकवतात आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देतात. असे उपक्रम शाळेत नियमित होणे गरजेचे आहे, यामुळे पुढच्या पिढ्याला जीवनाच्या प्रत्यक्ष आव्हानांसाठी तयार करता येते.
– दादाभाऊ रोकडे (माजी चेअरमन, वडगाव सावताळ)





