पारनेर/प्रतिनिधी :
पिंपळगाव रोठा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानाचा वार्षिक यात्रोत्सव यंदा ३ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीला होणारा हा सर्वात मोठा यात्रोत्सव मानला जातो. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाच्या यात्रेच्या नियोजनासाठी विविध विभागांची महत्त्वाची प्रशासकीय बैठक मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी देवस्थान जवळ पार पडली.
देवस्थानच्या अध्यक्षा शालिनीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस, आरोग्य, बांधकाम, महावितरण, एसटी महामंडळ, जीवन प्राधिकरण आणि कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. यात्रेकाळात भाविकांच्या सोयी-सुविधा, वीजपुरवठा, पाणी व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाली. तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी विविध विभागांना स्पष्ट सूचना दिल्या, जेणेकरून यात्रोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडेल.
बैठकीस माजी अध्यक्ष ॲड. पांडुरंग गायकवाड, पारनेर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, उपाध्यक्ष महेश शिरोळे, माजी सरपंच अशोक घुले, सरपंच सुरेखा वाळुंज, सचिव चंद्रभान ठुबे, जालिंदर खोसे, भाऊसाहेब गाडगे, साहेबराव वाफारे, पत्रकार गोरक्ष मदने, गोपीनाथ घुले, किरण शेलार, रामदास मुळे, रवींद्र राजदेव, संतोष वाळुंज, प्रशांत घुले, सौरभ क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरठण खंडोबा यात्रा राज्यभरातील भाविकांना आकर्षित करणारी असून, मानाच्या काठ्या, पालखी मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रम यामुळे ती विशेष वैशिष्ट्यपूर्ण ठरते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
राज्यभरातील भाविकांचे…..
कोरठण खंडोबा हे कुलदैवत आहे. तीन दिवसीय चालणा-या यात्रोत्सवात मोठ्या संख्येत भाविक येतात. प्रशासनाच्या वतीने यात्रा उत्सवाची तयारी सुरू आहे. सर्व प्रशासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
– गायत्री सौंदाणे (तहसीलदार,पारनेर)
🔶🔶🔶🔶🔶
देवस्थान समिती व प्रशासकीय विभागाच्या माध्यमातून यात्रा उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. यात्रा उत्सव काळात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने यात्रा उत्सव काळात उपस्थित राहावे.
– शालिनी घुले (अध्यक्षा कोरठण खंडोबा देवस्थान)






