पारनेर / ता. प्रतिनिधी,
देऊळगाव सिद्धी ता. नगर येथील श्रीमती कांताबाई जगन्नाथ कदम (वय ६७) यांचा रानडुकराच्या हल्ल्यात ३० जुन २०२६ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शासनाच्या वतीने त्यांच्या वारसदारांना मंजूर करण्यात आलेली २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आज पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते त्यांचे पती जगन्नाथ नारायण कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या या मदतीपैकी १५ लाख रुपये मुदत ठेवीच्या (एफडी) स्वरूपात ठेवण्यात आले असून, उर्वरित १० लाख रुपयांचा धनादेश लाभार्थी जगन्नाथ कदम यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी अहमदनगर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे, वन परिमंडळ अधिकारी आर. बी. घाटेसाव, वनरक्षक अशोक गाडेकर, लाभार्थी जगन्नाथ नारायण कदम, त्यांचे पुत्र बापू जगन्नाथ कदम, दत्तात्रय विश्वनाथ वाघमोडे, सरपंच प्रभाकर बोरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ रानडुकराच्या हल्ल्यात श्रीमती कांताबाई कदम यांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास शासनाच्या नियमानुसार संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. त्यानुसार कदम कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत मंजूर करून आज वितरित करण्यात आली आहे. वन विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असून, वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्कता बाळगावी. वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा.
– वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अविनाश तेलोरे
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
▪️ रानडुकराच्या हल्ल्यात श्रीम. कांताबाई कदम यांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेमुळे कदम कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. दुःखाच्या या प्रसंगी पीडित कुटुंबाला आर्थिक आधार मिळणे गरजेचे होते. शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली २५ लाख रुपयांची मदत आज त्यांच्या वारसदारांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वन विभागाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात. पीडित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
– आमदार काशिनाथ दाते सर (विधानसभा सदस्य)




