पारनेर : ता. प्रतिनिधी, 

 आजची नवी पिढी मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि डिजिटल जगतात हरवून जात असताना, त्यांना आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी अळकुटी येथील साईनाथ हायस्कूलच्या १९९८ एस एस सी. च्या माजी विद्यार्थ्यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांसह थेट ‘शिवतीर्थ रायगड’ किल्ल्याची सफर करत नव्या पिढीला इतिहासाचा खरा वारसा दाखवला. या विशेष मोहिमेत एकूण ४० जणांचा समुह सहभागी झाला होता. मोबाईल युगात हरवलेली मुले बाहेर काढण्याचा सहलीचा मुख्य उद्देश नव्या पिढीला केवळ किल्ले दाखवणे हा नसून, त्यांच्या बालमनावर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवसंस्कार बिंबवणे हा होता. 

२७०० फूट उंच असलेला रायगड पायथा पाचाड येथून पायऱ्यांनी सर करताना बालगायिक सुखदा थोरात हिने नमो शिवाजी राजा गायनातून मानवंदना देऊन, कड्या कपाऱ्यातून जाणारी रायगडाच्या वारीचा आनंद सर्वांनी घेतला. विविध फुलांनी बहरलेली फुललेला रायगड डोंगर परिसर मन मोहून टाकणारा होता. हिरकणी कडा अभेद्य असा गडाचा मुख्य आणि अत्यंत मजबूत प्रवेशद्वार महादरवाजा, राजसभा आणि सिंहासन, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या अवशेष, इतिहास डोळ्यांनी पाहताना, ऐकताना बॅचमधील सर्वजण भारावून गेले. क्षणभर महिला भगिनींच्या डोळ्यांत अश्रु तरळले. ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ टकमक टोक बघितले.

ऐतिहासिक जगदीश्वराच्या मंदिरात पडला सुरांचा पाऊस शिवरायांच्या स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या जगदीश्वराच्या मंदिरात पवित्र वातावरणात बालगयिका सुखदा थोरात हिने ओम नमः शिवाय भावनिक सुगंधाने घातलेली गायनाची साद खरोखर मनाला स्पर्श जाणारी, मनाला विलक्षण निरव शांतता देणारा अनुभव आज रायगडावर अनेक शिवभक्तांनी घेतला. गायन काळात मंदिराचा परिसर, समाधी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ काही वेळ निरव शांततेने थबकला. भटकंती सोबतच शिवभक्त पर्यटकांना सांगितिक अनुभूती मिळाली. यासोबतच रायगडाचे अथांग नैसर्गिक सौंदर्य, उंच कडे आणि किल्ल्याची अभेद्य रचना पाहून नवी पिढी भारावून गेली.

मेजर शिवाजी आवारी, मेजर दिलीप डेरे, आयटी वरीष्ठ अभियंता शिल्पा झावरे, फोटोग्राफर उमेश पुंडे यांनी ५० मिनिटात केलेली गतीमान गड चढाई करुन दिली महाराजांना आगळीवेगळी मानवंदना.

बालमनावर उमटले शिवसंस्कार मोबाईल स्क्रीनवर किल्ले पाहणाऱ्या मुलांनी जेव्हा प्रत्यक्ष रायगडाची माती कपाळाला लावली, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळांचे दर्शन घेतल्यानंतर तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळं चैतन्य, उत्साह पाहायला मिळाले. मनिष गोरे गाईडने मुलांना गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास सोप्या भाषेत समजावून सांगितला. यामुळे मुलांच्या मनात इतिहास आणि संस्कृतीबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *