पारनेर भगवान गायकवाड,
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सक्रिय विचारक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊसाहेब जाधव यांची सावित्री फातिमा सदभावना मंचचे कार्याध्यक्ष डॉ. आर. जी. सय्यद यांनी नुकतीच त्यांच्या कडूस ( ता.पारनेर) येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
गेल्या काही दिवसांपासून संजय जाधव (तात्या) यांची प्रकृती अस्वस्थ होती. ही माहिती मिळताच डॉ. सय्यद यांनी प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आस्थेने चौकशी केली. केवळ प्रकृतीची विचारपूस करून न थांबता, डॉ. सय्यद यांनी सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करत जाधव यांना मोलाचे मार्गदर्शनही केले.सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. “विचारांची लढाई लढण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही सुदृढ असणे आवश्यक आहे,” असे मत डॉ. सय्यद यांनी यावेळी व्यक्त केले. या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, वैचारिक वारसा जपणाऱ्या दोन पिढ्यांमधील हा स्नेह पाहून उपस्थित समाधान व्यक्त करत आहेत.




