शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी २८ मार्चला विशेष जनजागृती कार्यक्रम
अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत बालकांचे संरक्षण, महिलांची सुरक्षितता आणि सर्वांसाठी शिक्षणाचा अधिकार अधिक महत्त्वाचा ठरत आहे. अजूनही अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, बालविवाह, बालहक्कांचे उल्लंघन आणि महिलांवरील अन्याय यांसारख्या समस्या समाजात दिसून येतात. अशा परिस्थितीत प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षणाची संधी आणि महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळणे ही काळाची गरज बनली आहे. समाजाचा खरा विकास हा बालक आणि महिलांच्या संरक्षणातूनच शक्य आहे, या उद्देशाने स्नेहालय संस्थेच्या विविध प्रकल्पांच्या संयुक्त विद्यमाने विशेष जनजागृती व सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“बालक आणि महिला यांचे संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि योजनांच्या संधींचा संगम” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी मनपा प्राथमिक शाळा, गांधीनगर (लिंगेश्वर मंदिरासमोर, बोल्हेगाव) येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार आहे. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन प्रवेश सर्वेक्षण आणि शाळेत प्रवेशाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
यासोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक संरक्षण या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमामध्ये स्नेहालयच्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. युवकांसाठी कौशल्य विकास केंद्राद्वारे प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन, स्नेहाधार प्रकल्पांतर्गत महिला सक्षमीकरण व कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलमार्फत परवडणाऱ्या दरात उपचार, कम्युनिटी हेल्थ सेंटरद्वारे आरोग्य सेवा तसेच उडान, मुक्ती वाहिनी आणि स्नेह बाला आधार प्रकल्पांद्वारे बाल संरक्षण, बालहक्क, बालविवाह मुक्त जिल्हा अभियान आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार असून शाळेत प्रवेशासाठी थेट मदतही उपलब्ध होणार आहे. अशी माहिती स्नेहालय संस्थेचे संचालक हनिफ शेख यांनी दिली.




