पारनेर / भगवान गायकवाड, 
      शहरातील कोर्टगल्ली येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्र पारनेर येथे महाशिवरात्र उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.     

     परमपिता शिव परमात्मा यांच्या दिव्य अवतरणाचे स्मरण करत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यालयाच्या संचालिका साधना दिदी यांच्या हस्ते सकाळची ईश्वरीय ‘मुरली’ कथन करून झाला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या सोहळ्यासाठी पारनेर पब्लिक स्कूलचे प्राचार्य गिताराम म्हस्के (सर), प्रसिद्ध उद्योजक संभाजी मगर, देवराम थोरे,ॲड. जाधव भाऊसाहेब, थोरे साहेब, पवार सर, खोडदे भाई,राम भाई यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिव अवतरणाचे ९० वे वर्ष उपस्थितांना मार्गदर्शन करताना साधना दिदी यांनी महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या की, “श्रीमद्भगवद्गीतेच्या वचनानुसार, जेव्हा जेव्हा मनुष्य धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट होतो, समाजात नैतिकतेचा ऱ्हास होतो, अशा वेळी स्वयं निराकार परमपिता शिव या भारत भूमीवर अवतरीत होतात. शिव परमात्म्याने या सृष्टीवर अवतरीत होऊन आता ९० वर्षे पूर्ण होत आहेत. हे वर्ष ‘हीरक महोत्सवी’ आनंद घेऊन आले असून, मानवाच्या कल्याणासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे.”

अध्यात्मिक रहस्यांचे उलगडा साधना दिदी यांनी पुढे नमूद केले की, महाशिवरात्र म्हणजे केवळ उपवास किंवा जागरणाची रात्र नसून, ती अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याची रात्र आहे. जीवनातील विकारांचा त्याग करून आत्मिक शांतता मिळवणे हाच या सणामागचा खरा उद्देश आहे. 

🔶🔶🔶🔶🔶🔶
महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात, आपण महाशिवरात्रीला उपवास का करतो?या दिवशी पांढरी साडी का परिधान केली जाते?शंकराला कडू धोत्र्याचे फूल आणि तीन पानांचे बेल का अर्पण केले जाते? कपाळावर त्रिपुंड का लावले जाते?पिंडीवर अखंड अभिषेक आणि नारळ वाहण्यामागे कोणते शास्त्र आहे? निराकार शिव परमात्मा भारत भूमीवर कधी अवतरीत होतात या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त आणि आध्यात्मिक उत्तरे मिळवण्यासाठी पारनेर येथील कोर्टगल्लीतील सेवाकेंद्राला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन साधना दिदी यांनी केले आहे. ही ईश्वरीय सेवा सर्वांसाठी पूर्णतः विनामूल्य उपलब्ध आहे.

– अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय,
कोर्टगल्ली, पारनेर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *