निघोज येथे महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

पारनेर / भगवान गायकवाड,   

      “जिजाऊ माँ साहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर,समाजसेविका मुक्ता साळवे, फातिमा शेख या महा मातांनी अतोनात त्याग, बलिदान आणि खडतर परिश्रमातून या देशात स्वराज्य, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची मशाल पेटवली. त्यांच्या याच संघर्षामुळे आज आपल्याला लोककल्याणकारी संविधान मिळू शकले आहे. त्याग आणि समर्पणाशिवाय कोणतीही सामाजिक क्रांती किंवा व्यवस्था परिवर्तनाची चळवळ यशस्वी होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन ‘युनिटी ऑफ मूलनिवासी समाज’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर यांनी केले. 

       प्रथमतः महामातांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ रफिक सय्यद, डॉ.प्रमोद हिरभगत, प्रदीप नगरे, सुरेश रोकडे,महेंद्र रोकडे, सुधामती कवाद, प्रणव भालेराव, दिलीप सोनवणे, बाळासाहेब पातारे, हिरामण सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना करंदीकर यांनी महामातांच्या सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांनी आणि महापुरुषांनी जो लढा दिला, तो केवळ सत्तेसाठी नव्हता तर मानवी हक्कांसाठी होता. आजच्या पिढीने हा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी महापुरुषांचे विचार आत्मसात करणे, हाच त्यांच्या जयंतीचा खरा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याला संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणातून संत परंपरेतील सामाजिक समता, बंधुत्व, न्याय, एकता यांचे विचार मांडले. 

तसेच कु. रोशनी गायकवाड, कु. मृण्मयी करंदीकर, कु. आर्या तांबे, कु. हर्षता सुर्यवंशी, कु. संबोधी सोनवणे या विद्यार्थिनी भाषणातून महा मातांच्या विचाराचा जागर केला.यावेळी सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. 

सूत्रसंचालन हिरामण सोनवणे यांनी केले तर आभार दिलीप सोनवणे यांनी मानले.

 कुस्ती, ज्युडो कुराश स्पर्धेत तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय, विभागीय, तसेच राष्ट्रीय स्तरावर विशेष यश संपादन केल्या बद्दल कु. तन्वी दत्तात्रय सरोदे हिचा ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *