पारनेर / भगवान गायकवाड, 

स्नेहालय संस्था आणि श्यानडार इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २००७ पासून कार्यरत असणाऱ्या अहिल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर द्वारे गरीब रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय तपासणी आणि उपचार अत्यल्प दरात यापुढेही मिळत राहतील.

अहिल्यानगर येथील लॉरिड्ज न्युडसन कंपनीचे प्रमुख लक्ष्मण पुजारी यांनी हे अभिवचन नगरकरांना दिले..सावेडी परिसरातील श्रमिक बालाजी नगर येथील ‘प्रेम कॉर्नर’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा उपक्रम आज स्थलांतरित झाला. या नव्या वस्तूचे उद्घाटन पुजारी यांच्या हस्ते झाले. पुजारी यावेळी म्हणाले की,
“अहिल्यानगर कम्युनिटी हेल्थ सेंटर हे केवळ उपचार केंद्र नसून समाजाच्या तळागाळातील गरजूंसाठी विश्वास, माणुसकी आणि आशेचे प्रतीक आहे.

  सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमास आमच्या कंपनीकडून यापुढेही भक्कम सहकार्य दिले जाईल.” प्रस्ताविकात स्नेहालयच्या सचिव डॉ. प्रीती भोंबे यांनी सांगितले की, स्नेहालय आरोग्य, शिक्षण व सामाजिक पुनर्वसन या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे . त्याच ध्येयातून हे आरोग्य केंद्र अधिक सक्षम स्वरूपात नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.गेल्या चार वर्षांत या केंद्राद्वारे २९,८५७ रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यात आली.

 यामध्ये नगरच्या औद्योगिक क्षेत्रातील संघटित आणि असंघटित कामगार , स्थलांतरित मजूर, गरीब कुटुंबे, झोपडपट्ट्या आणि दुर्बल घटक तसेच ग्रामीण नागरिक यांना सेवांचा लाभ मिळाला.स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख यांनी सांगितले की नव्या वास्तूतील आरोग्य केंद्रामुळे समाजातील शेवटच्या घटकांसाठी स्वस्त आणि दर्जेदार सेवेची एक परंपरा निर्माण झाली. नवीन जागेत सर्व अध्यायवत असले तरी तपासणी शुल्कांचे दर मात्र पूर्वीप्रमाणेच अत्यल्प ठेवण्यात आले आहेत. यावेळी श्यानडार कंपनीचे मेडिकल ऑफिसर डॉ. ऋषभ फिरोदिया यांनी नमूद केले की, नगर मधील व्यावसायिक रुग्णालयांमध्ये केल्या जाणाऱ्या खर्चिक तपासण्यांना अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर मे एक पर्याय दिला. या आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, अत्यल्प दरात ईसीजी, एक्स-रे, फिजिओथेरपी उपचार तसेच सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या लॅब तपासण्या उपलब्ध करून देण्यात येतात. या सुविधेची माहिती जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन स्नायडर कंपनीचे माजी प्रमुख आणि स्नेहालय संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक अरविंद पारगावकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *