पारनेर / ता. प्रतिनिधी
शुक्रवार दि. १३ मार्च २०२६
पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील अनेक गावांना नजीकच पोलीस प्रशासनाची सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांना तातडीने सेवा मिळणार आहे.
पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी तालुक्यात वाढत्या लोकसंख्येचा आणि भौगोलिक विस्ताराचा विचार करून नवीन पोलीस ठाण्यांची गरज सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर गतवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच शासनाने अखेर हा निर्णय घेत राजपत्राद्वारे अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या नव्या पोलीस ठाण्यांच्या कार्यान्वयनामुळे तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, सावरगाव, ढोकी, नांदुर पठार, कर्जुले हर्या, काटाळवेढा, वनकुटे, पळसपुर, मांडवे खुर्द, कासारे, खडकवाडी, म्हसोबाझाप, देसवडे, वारणवाडी, वासुंदे, गारगुंडी, वडगाव सावताळ, ढवळपुरी, पळशी, काकणेवाडी, पोखरी, हिवरे कोरडा, पिंपळगाव रोठा, माळकुप, अक्कलवाडी, काळकुप, तिखोल, भनगडेवाडी, कारेगाव, डोंगरवाडी, धोत्रे खुर्द, भोंद्रे, धोत्रे बु, तास, गाजदीपूर अशा एकुण पस्तीस गावांचा समावेश टाकळी ढोकेश्वर या स्वतंत्र कार्यक्षेत्रात होणार असून गुन्हे प्रतिबंध, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे.
या निर्णयामुळे पारनेर पोलीस ठाण्यावरील पूर्वीचा भार कमी होणार असल्याने सबंधित पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पारनेर शहर, विरोली, पुणेवाडी, हातलखिंडी, सिध्देश्वरवाडी, बहिरोबावाडी, पानोली, कान्हुरपठार, वडुले, पिंपळगाव तुर्क, राळेगणसिध्दी, पिंपळनेर, वडगाव दर्या, भांडगाव, वेसदरे, वडगाव आमली, पिंप्री पठार, दैठणे गंजाळ, शेरी कोलदरा, सारोळा आडवाई, निघोज, किन्ही, जामगाव, गांजीभोयरे, लोणी हवेली, पिंप्रीजलसेन, शिरापुर, सांगवीसूर्या, चोंभुत, जवळा, रेनवडी, गुणोरे, पाडळी आळे, गाडीलगाव, कळस, राळेगण थेरपाळ, आळकुटी, हाकीगतपुर, माजमपुर, म्हस्के वाडी, कोहकडी, शेरीकासारे, मोरवाडी, पाबळ, म्हसे खुर्द, गारखिंडी, दवाणवाडी, वडझिरे, पठारवाडी, लोणी मावळा, चिंचोली, देवीभोवरे, दरोडी, वडगाव गुंड, पाडळी दर्या, शिरसुले, बाभुळवाडे, वडनेर बु, जाधववाडी, भाळवणी, रांधे, गोरेगाव, डिस्कळ, पाडळी तर्फे कान्हुर, कुरुंद, करंदी या सहसष्ट गावांतील नागरिकांनाही सुरळीत सुविधा मिळणार आहे.
संपूर्ण पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संपूर्ण एकशे एक गावांतील नागरिकांना या नवीन मंजुरीमुळे सुरळीत सुविधा मिळणार असल्याने व या अगोदरच सुपा पोलिस ठाण्याचा स्वतंत्र कारभार सुरु असल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार दाते सरांच्या प्रभावी पाठपुराव्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.




