डांबरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण; साईडपट्ट्या आणि अंतिम डांबरी थराचे काम बाकी – वस्तीवरील वीजप्रश्न सोडविण्यासाठीही पाठपुरावा करणार

पारनेर/प्रतिनिधी :

गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या बीएसएनएल ऑफिस ते विधाते वस्ती या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून, रस्त्याचे डांबरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हे काम मार्गी लागल्याची माहिती सुनिताताई सोबले यांनी दिली.

या रस्त्याचे यापूर्वी खडीकरण झाले होते. मात्र, डांबरीकरण आणि साईडपट्ट्यांची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देण्यात आली होती. तसेच काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. डांबर उपलब्ध नसणे यासह विविध कारणांमुळे काम रखडत असतानाही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला.

या कामासाठी आमदार काशिनाथ दाते सर यांनीही संबंधित ठेकेदारांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. सध्या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी साईडपट्ट्या आणि डांबरीकरणाचा अंतिम थर टाकण्याचे काम अद्याप बाकी आहे. तेही लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा सुनिताताई सोबले यांनी व्यक्त केली.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
रस्त्यानंतर आता वीजप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न…

विधाते वस्तीवरील नागरिक, विशेषतः माता-भगिनींनी रस्त्याबरोबरच वीजपुरवठ्याचा प्रश्नही मांडला आहे. या परिसरात अद्याप सिंगल फेज वीजजोडणी पोहोचलेली नसून, सागरदास भजनी मंडळापर्यंतही वीजपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सुमारे १५ ते २० नवीन वीजखांब उभारण्याची आवश्यकता असून, येत्या काळात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चाऱ्याचे नियोजन

पारनेर तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मागील वर्षी टँकरद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणीवाटप करण्यात आले होते. मात्र, यंदाची परिस्थिती लक्षात घेता वैयक्तिक पातळीवर पाणीवाटप करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून नियोजन करून नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले जाणार आहेत.

तालुक्यातील सोबलेवाडी, पुणेवाडी, विधाते वस्ती यांसह संबंधित परिसरातील वाड्या-वस्त्यांवर पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठीही पाठपुरावा करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे सोबले यांनी सांगितले.


🔶🔶🔶🔶🔶🔶
दुष्काळात काटकसरीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

यंदा तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याने नागरिकांनी दिवाळी साजरी करताना पाणी, पैसा आणि इतर संसाधनांचा काटकसरीने वापर करावा. सामूहिक जबाबदारी आणि नियोजनातूनच दुष्काळाच्या संकटावर मात करता येईल, असे आवाहनही त्यांनी केले.

पारनेरची लेक या नात्याने सर्व नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना, तालुक्यातील कोणतेही अर्धवट राहिलेले काम असो किंवा नवीन निधीतून होणारी विकासकामे असोत, ती पूर्ण करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय स्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सुनिताताई सोबले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *