बालविवाह रोखण्यासाठी निघोजमध्ये जनजागृती



पारनेर / भगवान गायकवाड, 
   
मुलगी शिकली, प्रगती झाली’ या विचाराला कृतीची जोड देत, बालविवाहमुक्त समाज घडवण्यासाठी स्नेहालय संस्था संचलित उडान प्रकल्प आणि मुक्तिवाहिनी प्रकल्पाने हाती घेतलेली मोहीम आता लोकचळवळ बनत आहे. नुकतेच निघोज येथे स्नेहालय संचलित ‘उडान प्रकल्प’ आणि ‘मुक्तिवाहिनी’च्या वतीने नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी स्नेहालय संस्थेचे संचालक जॉइस (यूके),विभागाच्या कार्यकारी अधिकारी संगीता सानप, उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे, प्राचार्य मनिषा गाडगे, उपप्राचार्य निर्मला सोबले, जयवंत पुजारी, मेहबूब इनामदार, पुष्पा वराळ , सुनील औटी, बेलोटे सर, काळे सर, भास्कर काकडे, पत्रकार भास्कर कवाद, आनंद भुकन, सागर आतकर ,उडान प्रकल्पाचे निशा वाघ, नेहा वाघ, शशिकांत शिंदे, महेश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या ‘शुभमंगल सावधान’ या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली असून, बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथेला मूठमाती देण्यासाठी समाज आता खंबीरपणे पुढे आला आहे.निघोज येथील शाळा, बसस्थानक परिसर आणि मळगंगा मंदिर परिसरात मुलींनी स्वतः पुढाकार घेत बालविवाह प्रतिबंध आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी रॅली काढली. 


या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे शुभमंगल सावधान’ हे पथनाट्य. विशेष म्हणजे, ज्या मुलींनी स्वतः बालविवाहाच्या संकटाचा सामना केला आणि ज्यांचे बालविवाह संस्थेच्या प्रयत्नांमुळे थांबवण्यात आले, त्याच मुलींनी हे पथनाट्य सादर केले. स्वतःच्या अनुभवातून मांडलेले हे नाट्य उपस्थितांच्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरले. संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत या पथनाट्याचे ३५२ हून अधिक प्रयोग झाले असून, हजारो नागरिकांपर्यंत या माध्यमातून बालविवाहविरोधी संदेश पोहोचवण्यात यश आले आहे.या उपक्रमाच्या यशासाठी निघोजमधील पत्रकार बांधव आणि श्री मुलिकादेवी विद्यामंदिर यांनी दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले. या कार्यक्रमास निघोज परिसरातील सरपंच, शिक्षकवृंद, महिला, विद्यार्थी, पालक आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी संपूर्ण गावाने या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे.शेवटी,“मुली शिकल्या तर समाज घडेल; चला, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया!”असा संदेश देत या जनजागृती कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे निघोज परिसरात एक सकारात्मक बदलाची लाट निर्माण झाली असून, बालविवाहाला आळा घालण्यासाठी तरुणाई पुढाकार घेत असल्याचे चित्र आश्वासक ठरत आहे.

सूत्रसंचालन मेहबूब इनामदार यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *