पारनेर / भगवान गायकवाड,
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासिका, परम आदरणीय राजयोगिनी दादी हृदयमोहिनी (गुलजार दादीजी) यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त पारनेर सेवाकेंद्रावर ‘श्रद्धांजली आणि ईश्वरीय स्मृती’ कार्यक्रमाचे सेंटरच्या संचालिका साधना दिदी यांनी आयोजन केले होते.
यावेळी तालुक्यातील अनेक भाई आणि माताजीनी दादीजींच्या स्मृतींना अभिवादन केले. दीपप्रज्वलनाने आणि दादीजींच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून करण्यात आली. पारनेर सेंटरच्या मुख्य संचालिका साधना दिदी यांनी दादीजींच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “दादी गुलजारजी हे केवळ एक नाव नसून ते साक्षात दिव्यत्वाचे आणि करुणेचे प्रतीक होते. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून त्यांनी स्वतःला ईश्वरार्पण केले होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे संयम, शुद्धता आणि अष्टशक्तींचे मूर्तिमंत उदाहरण होते.”
या विशेष दिनानिमित्त केंद्रावर ‘राजयोग मेडिटेशन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित सर्वांनी सामूहिकरीत्या वैश्विक शांततेसाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी ध्यानधारणा केली. दादीजींनी त्यांच्या आयुष्यात ज्याप्रमाणे शांततेचा संदेश जगाला दिला, त्याच मार्गावर चालण्याचा संकल्प यावेळी सर्व साधकांनी केला.
कार्यक्रमात वक्त्यांनी नमूद केले की, दादीजींनी केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार ब्रह्माकुमारी संस्थेचा आणि भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवला. त्यांची सौम्य वाणी आणि स्थिर बुद्धी यामुळे त्यांनी लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले.
यावेळी उपस्थित भाविकांना ‘ईश्वरीय प्रसाद’ आणि ‘वरदान’ कार्डांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन पारनेर सेंटरच्या सर्व सदस्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. “दादीजी आज देहरूपाने आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या शिकवणी आणि त्यांनी दिलेला प्रेमाचा संदेश सदैव मानवजातीला मार्गदर्शन करत राहील,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.




