पारनेर / भगवान गायकवाड, 
बालविवाह ही समाजाला लागलेली घातक कीड असून ती मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती घडवून आणण्यासाठी पारनेर तालुक्यातील तब्बल ५५० अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घेत निर्धार व्यक्त केला. ‘माझे गाव, बालविवाह मुक्त गाव’ तसेच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानांतर्गत पारनेर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ही कार्यशाळा जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन, स्नेहालय उडान प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण विपला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेत चाईल्ड हेल्पलाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संवाद साधताना सांगितले की, “बालविवाह हा केवळ सामाजिक गुन्हा नसून तो मुलांच्या मूलभूत मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. १८ वर्षांखालील मुलींचे विवाह झाल्यास त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि मानसिक विकासावर दूरगामी व घातक परिणाम होतात. हे वास्तव बदलण्याची ताकद अंगणवाडी सेविकांच्या सक्रिय कार्यातून निर्माण होऊ शकते.”


तालुका संरक्षण अधिकारी गोवर्धन वीर यांनी बालसंरक्षणाशी संबंधित कायदे आणि ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांच्या संरक्षणासंदर्भातील विविध कायदे, अधिकार आणि त्यांची अंमलबजावणी याविषयीही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

तसेच विपला फाउंडेशनच्या ॲड. शुभांगी रोहकले यांनी महिला अत्याचार, लैंगिक छळ आणि संबंधित कायद्यांची व्याप्ती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत बालविवाहाची कारणे आणि परिणाम यावरही सखोल चर्चा झाली. विशेषतः गरिबी, शिक्षणाचा अभाव, चुकीच्या रूढी-परंपरा, तसेच बालविवाहामुळे वाढणारा माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर या गंभीर बाबींवर चिंतन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर महिला सक्षमीकरण केंद्राच्या पूजा ढेरे, विपला फाउंडेशनचे अशोक चिंधे, पत्रकार भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाच्या समुपदेशक निशा वाघ यांनी स्नेहालय संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती देत ‘उडान’ प्रकल्पामार्फत बाल संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची तसेच ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीच्या कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यशाळेच्या शेवटी पारनेर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी “आमच्या कार्यक्षेत्रात एकही बालविवाह होऊ देणार नाही” असा सामूहिक संकल्प व्यक्त केला. या सामूहिक निर्धारामुळे पारनेर तालुका बालविवाह मुक्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत असल्याचे चित्र या कार्यशाळेतून स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *