पारनेर : प्रतिनिधी,
केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ अंतर्गत पारनेर तालुक्यातील नागरिकांना सौरऊर्जेचा लाभ मिळावा, वीजबिलाचा आर्थिक भार कमी व्हावा आणि प्रत्येक घर ऊर्जा स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने विशेष जनजागृती व नोंदणी अभियानाचा शुभारंभ शुक्रवार (दि. १७) रोजी सकाळी १० वाजता खा. नीलेश लंके यांच्या पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात होणार आहे. या अभियानाचे उद्घाटन लोकप्रिय खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते होणार आहे.
या अभियानाअंतर्गत नागरिकांना घरगुती सौरऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घरगुती वीजबिलात बचत होण्याबरोबरच स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे.
खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून लाभार्थ्यांचा आर्थिक सहभाग शक्य तितका कमी राहील, यासाठी आवश्यक समन्वय करण्यात आला असून, तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
दि. १७ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण पारनेर तालुक्यात हे विशेष नोंदणी अभियान चालविण्यात येणार आहे. इच्छुक नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, निलेश लंके प्रतिष्ठान, ‘आपला मावळा’ संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील उद्योजक, शेतकरी, युवक, महिला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाच्या शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नोंदणी करावी आणि ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’चा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




