पारनेर | ता. प्रतिनिधी,
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर वडझिरे येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व जलपूजन आमदार काशिनाथ दाते सर यांचे शुभहस्ते संपन्न झाले. राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. “मागचं सगळं विसरा, पुढे चला. मी आता केवळ एका गावाचा, एका गटाचा किंवा एखाद्या विचाराच्या लोकांचा प्रतिनिधी नाही; मी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील साडेतीन लाख जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय,” असे सांगत त्यांनी सर्वांना विकासाच्या प्रवाहात सोबत घेऊन जाण्याची भूमिका मांडली.
गेल्या काळातील मतभेद, राजकीय संघर्ष किंवा आरोप-प्रत्यारोप यामध्ये अडकून न पडता आगामी काळात मतदारसंघाच्या विकासासाठी एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्याकडून कोणत्याही गावाबाबत, कोणत्याही व्यक्तीबाबत किंवा कोणत्याही घटकाबाबत भेदभाव होणार नाही. ज्यांनी मला मतदान केले त्यांच्यासाठी तर काम करायचेच आहे; पण ज्यांनी केले नाही, त्यांच्यासाठीही त्याच ताकदीने काम करणे ही माझी जबाबदारी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडे, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादीचे अहिल्यानगर उपाध्यक्ष आर एस कापसे सर, रवींद्र गाजरे, राजू एरंडे, विवेक मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर चौधरी, राज केटर्सचे राजकुमार मोरे, सोनाबाई चौधरी विमल चौधरी रोहिणी गंधाक्ते, गोरख चौधरी, शिवाजी गंधाक्ते, ललित गंधाक्ते, लहू शेठ चौधरी, संभाजी मोरे, माजी चेअरमन किसन गंधाक्ते, शुभम निघुट, सुभाष निघुट, सोपान करकंडे, खंडू चौधरी, रामा चौधरी, कॉन्ट्रॅक्टर तेजस पाडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वडझिरे येथे तळे वस्ती ते शिवडोह रस्त्यासाठी १० लाख रुपये, गोसावी बाबा सभामंडपासाठी १० लाख रुपये तसेच चौधरी वस्तीवरील २५ लाख रुपये खर्चाच्या बंधाऱ्याचे जलपूजन ही कामे गावाच्या विकासाच्या पुढील टप्प्याची सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले. “आजची कामे ही शेवट नाहीत, तर पुढील विकासाची सुरुवात आहे. गावातील जे प्रश्न प्रलंबित आहेत, ते समजून घेऊन उपलब्ध निधी आणि शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ते मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️ “आमदार काशिनाथ दाते सरांनी मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गावागावातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती दिली आहे. वडझिरे येथे लोकार्पण झालेली रस्त्याची सुविधा, सभामंडप आणि बंधाऱ्याचे काम ही त्याच विकासदृष्टीची उदाहरणे आहेत. ‘मागचं सगळं विसरा, पुढे चला’ या भूमिकेतून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा निर्धार निश्चितच स्वागतार्ह आहे. आगामी काळातही शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देत वडझिरेसह संपूर्ण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार दाते सरांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकजुटीने प्रयत्न करू.”
– प्रशांत गायकवाड (मा.संचालक जिल्हा बँक अहिल्यानगर)




