पारनेर I प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यात सध्या खरीप हंगाम जोमात सुरू असतानाच युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटेपासूनच कृषी केंद्रांसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असून, दिवसभर उभे राहूनही खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका उपाध्यक्ष तथा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी आज तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने खत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी उप कृषीअधिकारी अलका गावडे मॅडम, देवेंद्र जाधव, संतोष जाधव, रविंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रविंद्र राजदेव यांनी म्हटले आहे की, सोयाबीन, बाजरी आणि इतरही पिकांसाठी सध्या युरिया खताची अत्यंत गरज आहे. मात्र, तालुक्यात पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी पहाटे पासून कृषी केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होत असून, या टंचाईचा गैरफायदा घेऊन खतांचा काळाबाजार किंवा सक्तीची लिंकिंग (इतर उत्पादने जबरदस्तीने गळ्यात मारणे) होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे पारनेर तालुक्यासाठी युरिया खताचा जादा कोटा मंजूर करून पुरवठा तातडीने सुरळीत करावा, कृषी केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी स्थानिक सोसायट्या किंवा ग्रामपंचायतींमार्फत खत वाटपाचे नियोजन करावे, खतांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या किंवा लिंकिंग करणाऱ्या केंद्रांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच प्रशासनाने पुढील २ ते ३ दिवसांत या समस्येवर सकारात्मक तोडगा न काढल्यास, खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लंके प्रतिष्ठान आणि तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने कृषी विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी दिला आहे.




