पारनेर / भगवान गायकवाड,    

    जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष आणि महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केवळ औपचारिक भाषणे न करता, आत्मचरित्रांचे ग्रंथ प्रदर्शन, प्रबोधनपर एकांकिका आणि विविध खेळांची सांगड घालत यंदाचा महिला दिन अत्यंत आगळ्या-वेगळ्या स्वरूपात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
                       कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी सर्व महिला प्राध्यापिका, शिक्षकेतर सेविका आणि विद्यार्थिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आजची महिला अतिशय कठीण परिश्रम करून प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहे. स्त्री ही आयुष्यातील सर्वच भूमिका अत्यंत लिलया पार पाडत असते, त्यामुळे तिचे कर्तृत्व महान असून ते शब्दांत मोजता येणार नाही. मात्र, हे यश मिळवत असताना ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’ याचे भान ठेवले पाहिजे. समाजात वावरताना विवेकी विचार पुढे आले पाहिजेत. तसेच, ‘महिलांनीच महिलांना आदर देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, तरच समाजाचा विकास अधिक वेगाने होईल,’ असा मोलाचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.


              या कार्यक्रमाची सुरुवात एका अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाने झाली. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात भारतासह जागतिक पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महान महिलांच्या आत्मचरित्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. यातून विद्यार्थिनींना कर्तृत्ववान महिलांच्या जीवनप्रवासाची ओळख झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘संवाद’ ही लक्षवेधी एकांकिका सादर केली. ‘कुटुंबामध्ये सुदृढ संवाद असणे किती गरजेचे आहे, आणि कुटुंबातील संवाद हरवल्यास मुलींवर कशी मोठी आपत्ती येऊ शकते,’ हा अत्यंत संवेदनशील आणि आजच्या काळातील महत्त्वपूर्ण विषय या एकांकिकेतून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विद्यार्थिनींसाठी विविध बौद्धिक आणि शारीरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभदा आरडे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन व सूत्रसंचालन प्रा. ज्योत्स्ना म्हस्के, प्रा. विद्या शेळके आणि प्रा. स्वप्नाली यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, डॉ. दिलीप ठुबे, डॉ. रघुनाथ नजन, डॉ. विजयकुमार राऊत, डॉ. सरिता कुंडलिकर, डॉ. माया लहारे आदी मान्यवरांसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, महिला वर्ग आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अत्यंत प्रेरणादायी वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *