अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
स्नेहालय संचलित उमेद प्रकल्प तसेच साऊ एकल महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण” जनजागृती कार्यक्रमाचे* आयोजन बालसंवाद केंद्र, गांधी मैदान, अहिल्यानगर येथे करण्यात आले. झोपडपट्टी भागातील एकल महिलांमध्ये हक्क, सन्मान, स्वाभिमान व स्वावलंबनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
स्नेहालयच्या उमेद प्रकल्पांतर्गत सेवावस्तीतील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू अशा ५३० एकल महिलांवर काम केले जात आहे. या महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी व व्यवसायासाठी पाठबळ देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमास साऊ एकल महिला फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अशोक कुटे, अल्फा लाव्हल फंडिंग एजन्सीच्या प्रमुख वनश्री वनकर, बालभवन प्रकल्पाच्या मानद संचालिका वैशाली चोपडा, स्नेहालय अनिवासी विभागाचे संचालक हनीफ शेख, सखी सेंटरच्या समन्वयक शबाना शेख तसेच स्नेहालयच्या स्वयंसेविका भावना मखीजा उपस्थित होत्या.
वैशाली चोपडा यांनी एकल महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी सक्षमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. अशोक कुटे यांनी एकल महिला पुनर्विवाहासंदर्भातील नवीन जी.आर.ची माहिती देत पुनर्विवाहाच्या विषयावर मार्गदर्शन केले. हनीफ शेख यांनी महिला हक्कांविषयी मार्गदर्शन केले, तर वनश्री वनकर यांनी एकल महिलांच्या सामाजिक वास्तवावर भाष्य करत प्रेरणादायी विचार मांडले. शबाना शेख यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली.
यावेळी उपस्थित एकल महिलांना नारी सन्मान’ योजनेचे लाभपत्र तसेच घरेलू कामगार कार्डांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सात सेवावस्तीतील ७८ महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यास्मिन शेख यांनी केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख प्रतीक्षा साळवे यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन प्रवीण कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू पांढरे, उषा खोल्लम व बालभवन टीम यांनी परिश्रम घेतले.




