उपविभागीय पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या सहकार्याने शहरात संयुक्त मोहिम बालसुरक्षेसाठी सज्ज यंत्रणा 

अहिल्यानगर ( भगवान गायकवाड),
संकटग्रस्त, बेवारस, हरवलेली, बालमजुरी, बालभिक्षा, बालविवाह अथवा अन्य प्रकारच्या शोषणाला बळी पडणाऱ्या बालकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने संरक्षण व पुनर्वसन मिळवून देण्याच्या उद्देशाने दि. १ जुलै २०२६ रोजी रात्री स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मुक्ती वाहिनी आणि स्नेह बाल आधार यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच उपविभागीय पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक नाईट पेट्रोलिंग करण्यात आले.

स्नेहालय संस्था गेल्या ३८ वर्षांपासून समाजातील विविध समस्यांवर सातत्याने कार्यरत असून, बालसंरक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्नेहालयची मुक्ती वाहिनी ही २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी सज्ज असते. आजपर्यंत या पथकाने २१८ संकटग्रस्त बालकांना विविध प्रकारच्या शोषण, बालमजुरी, बालभिक्षा, बालविवाह, बेवारस अवस्था आणि इतर धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करण्यात यश मिळवले आहे.

या विशेष नाईट पेट्रोलिंगदरम्यान चितळी रोड, दिल्ली गेट, सिद्धी बाग, जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर, पत्रकार चौक, प्रोफेसर चौक, तोफखाना पोलीस ठाणे, सिद्धी कॉलनी, तारकपूर बसस्थानक, डीएसपी चौक, कोठला स्टँड, स्वस्तिक चौक, पुणे बसस्थानक, सक्कर चौक, टिळक रोड, कोतवाली पोलीस ठाणे, कापड बाजार, रेल्वे स्थानक, माळीवाडा, वाडिया पार्क, एमआयडीसी परिसर तसेच शहरातील विविध पोलीस ठाणे व रेल्वे पोलीस ठाण्यांना भेटी देण्यात आल्या.

पेट्रोलिंगदरम्यान चहा विक्रेते, पानटपरी चालक, रिक्षा व टॅक्सी चालक, सुरक्षा रक्षक, फेरीवाले तसेच रात्री काम करणाऱ्या विविध घटकांशी संवाद साधून संकटग्रस्त बालके आढळल्यास तात्काळ मुक्ती वाहिनीला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील हे सर्व घटक बालसंरक्षण मोहिमेतील महत्त्वाचे स्वयंसेवक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

नाईट पेट्रोलिंगदरम्यान एखादे बालक बेवारस किंवा संकटग्रस्त अवस्थेत आढळल्यास पोलीस विभागाच्या समन्वयातून त्याला तातडीने संरक्षण देऊन पुढील कायदेशीर व पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात येते. या संपूर्ण उपक्रमासाठी उपविभागीय पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे व पोलीस यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याची माहिती स्नेहालयच्या वतीने देण्यात आली.

या मोहिमेचे संपूर्ण नियोजन व संचालन प्रवीण कदम, शाहिद शेख, आवेज हबीब तसेच उडान प्रकल्प, मुक्ती वाहिनी आणि स्नेह बाल आधार यांच्या संपूर्ण पथकाने केले.

यावेळी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, आपल्या परिसरात कोणतेही बालक बेवारस, हरवलेले, बालमजुरी, बालभिक्षा, बालविवाह किंवा अन्य संकटग्रस्त अवस्थेत आढळल्यास तात्काळ स्नेहालय मुक्ती वाहिनी 9011098008,उडान हेल्पलाइन 9011026495,चाइल्ड हेल्पलाईन १०९८ अथवा पोलीस हेल्पलाईन ११२ वर संपर्क साधावा. प्रत्येक जागरूक नागरिकाच्या एका फोनमुळे एका निरागस बालकाचे आयुष्य सुरक्षित होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *