जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून खेळाधारित शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

अहिल्यानगर / भगवान गायकवाड, 
  
अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात यंदा आनंद, सहभाग आणि खेळाच्या अनुभवातून झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, IAS, सत्यजित तांबे सदस्य विधान परिषद महाराष्ट्र,रश्मी नागोरी सी एस आर प्रमुख नुवामा ग्रुप, श्रद्धा रोहित देशमुख शिक्षण प्रमुख संस्कृती संवर्धन मंडळ, गिरिश कुलकर्णी संस्थापक स्नेहालय व श्वेता चारी संस्थापक द ओपनट्री फाऊंडेशन यांनी “खेळ जपा बालपण जपा” जिल्हास्तरीय चर्चासत्रात केलेल्या घोषणेनुसार, जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये “पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा” हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध खेळ, कृती आणि सहभागात्मक उपक्रमांमधून शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद अनुभवला. अनेक शाळांमध्ये खेळांशी संबंधित सजावट, पोस्टर्स, संदेश आणि उपक्रमांच्या माध्यमातून मुलांचे स्वागत करण्यात आले.
हा उपक्रम केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, शाळेच्या वातावरणात आनंद, उत्सुकता, आत्मविश्वास आणि शिकण्याची तयारी निर्माण करण्यासाठी खेळाधारित शिक्षणाचा दृष्टिकोन रुजवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

११ जून रोजी आयोजित “खेळ जपा बालपण जपा” या जिल्हास्तरीय चर्चासत्रात मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या अनुभवांवर चर्चा झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून सर्व १४ गटशिक्षणाधिकाऱ्यांना “पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा” राबवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.
या उपक्रमासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना आणि कृतींची रूपरेषा द ओपनट्री फाउंडेशन (TOF) कडून तयार करण्यात आली होती. १० जून रोजी TOF टीमने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. शाळांनी या मार्गदर्शक सूचनांसोबतच उपलब्ध खेळ साहित्य, स्थानिक संसाधने आणि शिक्षकांच्या कल्पकतेनुसार विविध उपक्रम राबवले.


द ओपनट्री फाउंडेशन गेल्या २२ वर्षांपासून Conscious Play® या दृष्टिकोनातून मुलांच्या शिकण्यात खेळाचे महत्त्व अधोरेखित करत आहे. स्नेहालयच्या सहकार्याने अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या या कामाला आता जिल्हा प्रशासन, शिक्षक आणि शाळांच्या सहभागातून व्यापक स्वरूप मिळत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत खेळाधारित शिक्षणाचा अनुभव पोहोचवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, अहिल्यानगरला महाराष्ट्रातील पहिला Play-integrated District बनवण्याच्या प्रवासातील ही एक निर्णायक सुरुवात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *