अहमदनगर / भगवान गायकवाड,
जागतिक महिला दिन आणि बोल्हेगाव फाटा, नगर–मनमाड रोड, नागापूर येथील भारत पेट्रोल पंपाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले महिलांसाठीचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या वतीने आयोजित या शिबिरात तब्बल २८३ महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जनरल हेल्थ चेकअप, डोळ्यांची तपासणी, विविध रक्त तपासण्या, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने महिलांची तपासणी करून आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख संचालिका मेघा बनकर मॅडम व मंगल वाघ मॅडम होत्या. त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत स्नेहालयचे संस्थापक मा. गिरीश कुलकर्णी, स्नेहाधार प्रकल्पाचे संचालक मा. प्रवीण मुत्याल आणि अनिवासी प्रकल्पाचे संचालक मा. हनीफ शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर तसेच महिलांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या हस्ते केक कटिंग करून करण्यात आली. कार्यक्रमास मनोज जाधव, सईद उल खैर आणि कीर्ती कुमार हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मानकर (स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल रिसर्च सेंटर) यांनी केले, तर रमेश वाघ (भारत पेट्रोल पंप) यांनी आभार प्रदर्शन केले.
महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला असून उपस्थित महिलांनी या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्याचा संदेश देणारे हे शिबिर खऱ्या अर्थाने समाजोपयोगी ठरले.




