अहिल्यानगर / भगवान गायकवाड,
आजच्या काळात मुलांच्या मनात निर्माण होणारा राग, असहिष्णुता आणि भावनिक अस्थिरता हा समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय बनत चालला आहे. मानसशास्त्रज्ञ सांगतात की आजची मुले अत्यंत संवेदनशील झाली आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, वेगवान जीवनशैली आणि बदललेले कौटुंबिक वातावरण यामुळे मुलांच्या मनावर लहान वयातच अनेक मानसिक ताण निर्माण होत आहेत. पूर्वी मुलांना राग येत असे, पण तो काही क्षणांत विसरला जायचा. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. पालकांनी थोडेसे रागावले तरी काही मुले मनावर घेतात, काही घरातून बाहेर पडतात, तर काही स्वतःला एकटे समजू लागतात. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही अवस्था आता अगदी ७-८ वर्षांच्या मुलांमध्येही दिसू लागली आहे.
आज घडलेल्या एका घटनेने ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा स्पष्ट केली. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात राहणारा फक्त आठ वर्षांचा एक मुलगा आईने रागावल्यामुळे संतापाच्या भरात घरातून बाहेर पडला. त्या क्षणी त्याच्या मनात इतका राग होता की त्याने काहीही विचार न करता थेट रेल्वेत जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात त्याला काहीच समजत नव्हते. रेल्वे निघाली, पुणे मागे पडले… आणि काही वेळाने जेव्हा राग शांत झाला तेव्हा भीतीने त्याचे मन व्यापून टाकले. “मी काय केलं? आता माझं काय होणार?” असे प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते.
रेल्वे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर पोहोचली तेव्हा तो मुलगा उतरला आणि स्टेशनच्या एका कोपऱ्यात बसून रडू लागला. त्याची अवस्था पाहून तिकीट तपासनीस (TC) यांनी त्याच्याकडे लक्ष दिले. सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित तो स्थानिक मुलगा असेल, पण विचारपूस केल्यानंतर मुलगा खूप घाबरलेला असल्याचे लक्षात आले. तो काहीच बोलत नव्हता, फक्त रडत होता. परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र पोलिसांना पाहिल्यानंतर मुलगा आणखी घाबरला. त्यामुळे तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला माहिती देण्यात आली.
चाईल्ड हेल्पलाईनने लगेच स्नेहालयच्या मुक्त वाहिनी प्रकल्पाचे कार्यकर्ते विनायक महाले यांना संपर्क केला. “एक आठ वर्षांचा मुलगा रेल्वे स्टेशनवर सापडला आहे, तो खूप घाबरलेला आहे,” अशी माहिती मिळताच विनायक महाले यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ स्टेशन गाठले.प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली. तेथे पोहोचल्यावर समोर एक लहानसा मुलगा भीतीने थरथरत बसलेला दिसला. तो कोणाशीही बोलत नव्हता. स्नेहालयच्या मुक्त वाहिनीच्या कार्यकर्त्यांना अशा परिस्थितीत मुलांशी कसे बोलावे, त्यांचा विश्वास कसा जिंकावा आणि त्यांना सुरक्षिततेची भावना कशी द्यावी याचे विशेष प्रशिक्षण दिलेले असते. त्याच प्रशिक्षणाचा उपयोग करत विनायक महाले यांनी त्या मुलाला शांत केले, त्याच्याशी मित्रासारखे संवाद साधला आणि हळूहळू त्याला बोलते केले.
थोड्या वेळाने मुलगा सांगू लागला – “मम्मी मला खूप रागावली… मला तिचा खूप राग आला… म्हणून मी रेल्वेत बसलो. पण नंतर मला खूप भीती वाटू लागली. सगळे लोक अनोळखी होते.” त्याने पुढे सांगितले की त्याचे घर पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. त्यानंतर ताबडतोब पुणे रेल्वे स्टेशनशी संपर्क करण्यात आला. काही वेळातच मुलाचे पालक शोधण्यात यश आले आणि त्यांना सकाळी मुलाला घेण्यासाठी बोलावण्यात आले. दरम्यान मुलाची वैद्यकीय तपासणी करून बालकल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला तात्पुरत्या स्वरूपात शासकीय बालगृहात सुरक्षित निवारा देण्यात आला. त्या मुलाला आता वाटत होते की तो एकटा नाही, त्याच्या सुरक्षिततेसाठी लोक उभे आहेत.
ही घटना फक्त एका मुलाची कथा नाही, तर आजच्या समाजासाठी मोठा इशारा आहे. कारण अशा घटना आता वारंवार घडताना दिसत आहेत. अनेक मुले रागाच्या भरात घर सोडतात, काही शहराच्या आकर्षणामुळे पळून येतात, तर काही मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणामुळे किंवा मोबाईल-सोशल मीडियाच्या प्रभावामुळे चुकीचे निर्णय घेतात.
याच कारणामुळे स्नेहालयची मुक्त वाहिनी टीम दररोज रात्री शहरात गस्त घालते. रेल्वे स्टेशन, बस स्थानके, शहरातील गर्दीची ठिकाणे येथे जाऊन अशी कोणती मुले अडचणीत आहेत का, कोणी हरवले आहे का, कोणाला मदतीची गरज आहे का याचा शोध घेतला जातो. अनेक वेळा या नाईट पेट्रोलिंगदरम्यान अशी मुले सापडतात जी रागाच्या भरात किंवा आकर्षणामुळे घरातून निघून आलेली असतात. अशा मुलांना समुपदेशन करून सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवले जाते.
गेल्या ३८ वर्षांपासून स्नेहालय संस्था बालकांच्या संरक्षणासाठी अविरतपणे कार्य करत आहे. पूर्वी अनेक मुले हरवायची, काही मुलांची तस्करी व्हायची, काही मुले गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकायची. मात्र स्नेहालयच्या सातत्यपूर्ण कामामुळे आज अहिल्यानगर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेरही अशा बालकांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होत आहे.
आज घडलेली ही घटना प्रत्येक पालकासाठी एक मोठा धडा आहे. आठ वर्षांचा मुलगा इतका मोठा निर्णय घेतो, याचा अर्थ मुलांच्या मनात भावना किती लवकर निर्माण होत आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे पालकांनी मुलांशी अधिक संवाद साधणे, त्यांना समजून घेणे, त्यांच्या भावना ऐकणे आणि मोबाईल-सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मुलांना फक्त शिक्षण आणि सुविधा नाही, तर प्रेम, समजून घेणारे वातावरण आणि सुरक्षिततेची भावना देखील तितकीच आवश्यक असते.
रागाच्या एका क्षणाने आज एक लहानसा मुलगा रेल्वेत बसून दुसऱ्या शहरात पोहोचला… पण सुदैवाने समाजात स्नेहालयसारख्या संस्था असल्यामुळे त्याचे बालपण सुरक्षित राहिले. ही घटना प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारी आहे – आपण आपल्या मुलांना किती समजून घेतो?
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपल्या आसपास एखादे बालक बेवारस अवस्थेत, घाबरलेले, हरवलेले किंवा कोणत्याही संकटात दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी तात्काळ योग्य यंत्रणेला माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुमचा एक छोटासा फोन कॉल एखाद्या बालकाचे आयुष्य सुरक्षित करू शकतो. म्हणूनच अशा कोणत्याही परिस्थितीत चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा उडान मुक्ती वाहिनी – 9011098008 / 9011026495 या क्रमांकावर ताबडतोब संपर्क साधावा. लक्षात ठेवा, आपला एक फोन कॉल एखाद्या बालकाचा जीव वाचवू शकतो आणि त्याचे भविष्य सुरक्षित करू शकतो.
आपला नम्र
– प्रविण कदम, प्रकल्प व्यवस्थापक




