पारनेर / भगवान गायकवाड, 
    “जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक असते. आजच्या युगात ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी सजगता महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ढाल-तलवार महत्त्वाची होती, मात्र आजच्या लोकशाहीत लेखणी आणि कागदाला (पुराव्याला) अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शाहुराव औटी यांनी केले.
भारतीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून पारनेर तालुका ग्राहक पंचायत,पारनेर तहसीलदार कार्यालय व पुरवठा विभाग यांच्या नियोजनाखाली, डी. के. आवटी फार्मसी कॉलेज येथे विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुरवठा अधिकारी प्रवीण वाढई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.परवेज औटी तसेच सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     कार्यक्रमाचा प्रारंभ ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदू माधव जोशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा मार्गदर्शक हरिभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष शहाजी पांढरे, दत्ता औटी, मच्छिंद्र नगरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ॲड. मंगेश औटी यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा मार्गदर्शक हरिभाऊ चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कोणतेही मानधन न घेता ग्राहक पंचायत निस्वार्थीपणे कार्य करत असते. समाजात जनजागृती करण्याची सर्वात मोठी जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आणि विद्यार्थ्यांवर आहे.” त्यांनी दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देऊन ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, यावर प्रकाश टाकला.

ग्राहक हक्कांचे सविस्तर मार्गदर्शन करताना मुख्य मार्गदर्शक शाहुराव औटी यांनी आपल्या भाषणात ग्राहकांच्या सहा मूलभूत हक्कांची सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकाराचा वापर प्रत्येक ग्राहकाने आपल्या हितासाठी केला पाहिजे.जिथे ग्राहक नडला जातो, मग तो शेतकरी असो, विद्यार्थी असो वा शिक्षक, तिथे ग्राहक पंचायत ठामपणे पाठीशी उभी राहते.कोणतेही प्रश्न सोडवताना ते शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने सोडवणे महत्त्वाचे आहे. अनुचित व्यापाराला आमचा विरोध आहे, परंतु प्रामाणिक व्यापाऱ्यांना आधार देणे ही देखील आमची भूमिका आहे.यावेळी त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा नेमका कधी आणि कोणाच्या काळात मंजूर झाला, याचा इतिहासही विद्यार्थ्यांना सांगितला.तालुकाध्यक्ष शहाजी पांढरे यांनी प्रास्ताविकात ‘ग्राहक जागा झाला पाहिजे’ यावर भर दिला. कार्यक्रमाच्या शेवटी पुरवठा अधिकारी प्रवीण वाढई यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version