राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत विभागीय पुरस्कार सोहळ्यात विशेष सन्मान; सामाजिक बांधिलकीचे कौतुक

पारनेर / प्रतिनिधी,

जलसंधारण आणि ग्रामीण विकासाच्या कार्याला लोकसहभागाची जोड देत भाजपा राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी ‘जलतारा’ योजनेसाठी तब्बल पाच लाख रुपयांचे वैयक्तिक आर्थिक योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.०’ अंतर्गत आयोजित विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.

ग्रामीण भागातील भूजल पातळी वाढवणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांना शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून देणे, या उद्देशाने ‘जलतारा’ योजना राबविण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी अशा योजनांना लोकसहभागाची जोड मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच सामाजिक जाणीव ठेवून विश्वनाथ कोरडे यांनी स्वतःहून पाच लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध करून दिला. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता समाजातील दानशूर व्यक्तींनीही ग्रामविकासाच्या कार्यात पुढाकार घ्यावा, या भावनेतून त्यांनी दिलेले हे योगदान विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आणि जलसंधारणाच्या कार्यातील सहभागाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

सन्मान सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी विश्वनाथ कोरडे यांच्या दातृत्वाचे आणि ग्रामविकासाप्रती असलेल्या योगदानाचे कौतुक केले. शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा असून, अशा लोकसहभागातून ग्रामीण भागाच्या विकासाला निश्चितच गती मिळू शकते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय आमदार काशिनाथ दाते, मोनिकाताई राजळे, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाषराव दुधाडे, रमेश गाडगे, अर्जुन नवले, मंगेश खोसे, निलेश ठाणगे, मयूर ठाणगे, विजय काकडे, आप्पा फडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version