केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निवेदन

पारनेर/प्रतिनिधी : 
कुरुंद येथील घोड नदीवर सेतु पुलाच्या बांधकामाची मागणी स्थानिक नागरिकांनी तीव्र केली आहे. या पुलामुळे नगर आणि पुणे जिल्ह्यांना थेट जोडणी मिळेल, ज्यामुळे दैनंदिन जीवनातील मोठी अडचण दूर होईल. सध्या पुलाअभावी या भागातील रहिवाशांना नगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिरूर येथून वळसा घेऊन जावे लागते. यामुळे प्रवासाचा अवधी वाढतो, इंधनाचा अपव्यय होतो आणि आर्थिक भार वाढतो.

मौजे कुरुंद, तालुका पारनेर येथील घोड नदीवरील जुना घाट परिसर हा नगर-पुणे जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु पुल नसल्याने पावसाळ्यात नदी ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरते. शालेय विद्यार्थींना शाळेत जाणे कठीण होते, रुग्णांना वैद्यकीय सुविधांसाठी वेळेवर पोहोचता येत नाही, शेतकऱ्यांना बाजारपेठेत माल नेणे अवघड होते आणि नोकरदार, व्यवसायिक यांना दैनंदिन प्रवासात त्रास सहन करावा लागतो. या समस्येमुळे परिसरातील विकासावरही परिणाम होत आहे.
या मुद्द्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे यांनी सक्रिय पावले उचलली आहेत. त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे विस्तृत निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, या सेतु पुलाचे बांधकाम झाल्यास दोन्ही जिल्ह्यांमधील दळणवळण क्रांती घडेल. व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

तालुकाध्यक्ष उबाळे यांनी या पुलाच्या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला आहे. 

उबाळे यांनी सुचवले की, मा. नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यातून केंद्रीय राखीव निधी (CRF) योजनेतून या प्रकल्पाला प्राधान्य द्यावे. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, युवक आणि महिला यांचा या मागणीकडे मोठा पाठिंबा आहे. अनेकदा गावकऱ्यांनी याबाबत आंदोलने, मोर्चे आणि निवेदने दिली आहेत.
नागरिकांची अपेक्षा आहे की, शासनाने या गरजेच्या पुलाच्या बांधकामाला तातडीने मंजुरी द्यावी आणि निधी उपलब्ध करून द्यावा. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांची कायमस्वरूपी गैरसोय दूर होईल आणि विकासाला चालना मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version