आ. दातेंनी मांडला रोजगारनिर्मितीचा आराखडा
पारनेर / ता. प्रतिनिधी,
शनिवार दि. २४ आक्टो. २०२६ तालुक्यातील मच्छीमारांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि मांडओहळ तलावासह परिसरातील लहान-मोठ्या जलाशयांच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांनी मांडओहळ तलावाला भेट देऊन स्थानिक मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार काशिनाथ दाते सर यांनी स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायाची सद्यस्थिती, आवश्यक सोयी-सुविधा आणि मत्स्यव्यवसायातून निर्माण होऊ शकणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचा सविस्तर आढावा मंत्र्यांसमोर मांडला.
या भेटीदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती स्थानिक मच्छीमार व नागरिकांना दिली. शासनाच्या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास मत्स्यव्यवसायात प्रगती साधता येऊ शकते, तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात मांडओहळ तलावासह परिसरातील जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
आमदार काशिनाथ दाते सर यांनी मच्छीमारांना भेडसावणाऱ्या अडचणी, व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि मत्स्योत्पादन वाढविण्याच्या संभाव्य संधी यांची माहिती दिली. योग्य नियोजन, मत्स्यबीजाची उपलब्धता, आवश्यक तांत्रिक सुविधा आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. त्याचबरोबर युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन परिसराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मत्स्यबीज उत्पादन, मत्स्यसंवर्धन, आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि पात्र लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्य यांसारख्या घटकांचा योजनांमध्ये समावेश असू शकतो. मांडओहळ तलाव आणि परिसरातील जलाशयांसाठी पाण्याची उपलब्धता, तांत्रिक निकष व शासनाच्या नियमांनुसार योग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मांडओहळ तलाव आणि परिसरातील जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसायाच्या संधी विकसित झाल्यास स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेला भक्कम आधार मिळू शकतो. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शास्त्रीय मत्स्यसंवर्धन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच मिळाल्यास या क्षेत्रात शाश्वत रोजगारनिर्मितीची दारे खुली होऊ शकतात. या दृष्टीने शासन, प्रशासन आणि स्थानिक मच्छीमार यांच्यात समन्वय राखून पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता या भेटीतून अधोरेखित झाली.
यावेळी आमदार काशिनाथ दाते सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, मा. जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, तहसीलदार गायत्री सौंदाणे, उद्योजक दिलीप दाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सोनाबाई चौधरी, महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, युवती तालुकाध्यक्षा अपर्णा खामकर, सोनाली कुलथे, जयश्री शिंदे, नीलम गोसावी, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष पंढरीनाथ उंडे, टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते देवराम मगर, ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष अरुण राजदेव, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष अशोक खैरे, सहकार सेलचे तालुकाध्यक्ष बबनराव पायमोडे, दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष रवींद्र आहेर, संतोष शेलार, राजेंद्र उबाळे यांच्यासह स्थानिक मच्छीमार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️ मांडओहळ तलावातील मत्स्यव्यवसायाला मोठी संधी असून, त्यातून स्थानिक मच्छीमारांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळू शकते. मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या प्रश्नांची सकारात्मक दखल घेऊन सहकार्याची भूमिका घेतली, ही समाधानाची बाब आहे. मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्थानिक मच्छीमारांपर्यंत पोहोचावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.
– आमदार काशिनाथ दाते सर (सदस्य पारनेर – नगर विधानसभा)




