खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली, रविंद्र राजदेव यांच्या प्रयत्नांना यश; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार

टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ, खामकर झाप, टाकळी ढोकेश्वर आणि पारनेर या मार्गावरील एसटी बससेवा उद्या, सोमवार दि. १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते श्री. रविंद्र राजदेव यांच्या प्रयत्नांमुळे ही बससेवा सुरू होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 या मार्गावर आजवरच्या इतिहासात एकही एसटी बस धावली नव्हती. या मार्गावर नियमित एसटी बससेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने केली जात होती. बससेवेअभावी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी रविंद्र राजदेव यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने आता या मार्गावरील प्रवाशांना एसटी बससेवेचा लाभ घेता येणार आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
उद्या सकाळी ९ वाजता बससेवेचा प्रारंभ….

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता या बससेवेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहनातून देण्यात आली आहे. वडगाव सावताळ येथून बससेवेला सुरुवात होणार असून, खामकर झाप, टाकळी ढोकेश्वर मार्गे पारनेरपर्यंत ही बस धावणार आहे.

या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी, तसेच नागरिकांना बाजारपेठ, शासकीय कार्यालये आणि इतर कामांसाठी प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे.

🔶🔶🔶🔶🔶
ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन….

या बससेवेच्या प्रारंभप्रसंगी वडगाव सावताल येथील सर्व ग्रामस्थांनी उद्या सकाळी ठीक साडेआठ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रविंद्र राजदेव यांच्या प्रयत्नातून सुरू होणारी ही बससेवा परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

🔶🔶🔶🔶🔶🔶
“वडगाव सावताळ, खामकर झाप, टाकळी ढोकेश्वर ते पारनेर या मार्गावर एसटी बससेवा सुरू होत असल्याने परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण होत आहे. या बससेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. खासदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र राजदेव यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.”
— मोहनराव रोकडे, जिल्हा प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *