प्र. ग. खिलारी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या लेझीम सादरीकरणाने वेधले लक्ष
टाकळी ढोकेश्वर I प्रतिनिधी,
रयतेच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कार्य करणारे थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्र. ग. खिलारी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्रशेठ राजदेव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची ढोकेश्वरपरिसरातून पारंपरिक वाद्यांच्या तालावर उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या अप्रतिम लेझीम नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनींचे शिस्तबद्ध व उत्स्फूर्त लेझीम सादरीकरण हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण करण्यात आले. ग्रामीण व वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
‘कमवा आणि शिका’ या विचारातून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेले योगदान समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्र राजदेव, प्र. ग. खिलारी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडितराव झावरे, मळीभाऊ रांधवण, टाकळी ढोकेश्वरचे उपसरपंच रामभाऊ तराळ, रविंद्र बांडे, खामकर सर, शिक्षक कर्णा रोकडे, राऊत सर, भोंडवे सर, घोडके सर, भिंगारे सर, रोहकले मॅडम, थोरात मॅडम, ठागणे मॅडम, पवार मॅडम, शिक्षक, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




