पारनेर / प्रतिनिधी,
सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या पुढाकाराने व अध्यक्षतेखाली क्षेत्रस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पारनेर येथील तहसील कार्यालयात संपन्न झाली. शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शेतरस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सूचनेनुसार सोमवार, दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सौ. गायत्री सौंदाने यांचेसह पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे, कृषी अधिकारी गजानन घुले, उप अभियंता सुबोध वसईकर, किरण जाधव , भुमी अभिलेख पाटील व संबंधित विभागांचे अधिकारी व क्षेत्रस्तरीय समितीचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रस्तावित व प्रलंबित रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना वर्षभर सुरक्षित व सुलभ दळणवळण मिळावे, शेतीमाल वाहतुकीस अडथळे येऊ नयेत, तसेच रस्त्यांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत, याबाबत आमदार काशिनाथ दाते सर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विकासकामे राबविणे हा आपला प्राधान्यक्रम असून, बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना ही केवळ रस्ता बांधकामापुरती मर्यादित नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीशी जोडलेली असल्याचे आमदार दाते सर यांनी यावेळी नमूद केले. कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये व योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या प्रश्नांना निश्चितच चालना मिळणार असून, आगामी काळात शेत-पाणंद रस्त्यांची कामे वेगाने मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
🔶🔶🔶🔶🔶🔶
“मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेअंतर्गत प्रस्तावित व प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. समिती अध्यक्ष आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिलेल्या सूचनांनुसार संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून रस्त्यांची कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.”
– श्रीकुमार चिंचकर, प्रांताधिकारी, पारनेर – श्रीगोंदा
🔶🔶🔶🔶🔶🔶
“शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना अत्यंत महत्त्वाची आहे. आमदार काशिनाथ दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करून योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल.”
– सौ. गायत्री सौंदाने, तहसीलदार पारनेर
