बालसंरक्षण कायद्याबाबत पत्रकारांना मिळणार सखोल मार्गदर्शन
पारनेर / भगवान गायकवाड,
सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात बालकांचे संगोपन आणि त्यांचे संरक्षण ही एक मोठी सामाजिक जबाबदारी बनली आहे. विशेषतः बालकांशी संबंधित गुन्हे किंवा घटनांचे वार्तांकन करताना माध्यमांची भूमिका अत्यंत संवेदनशील असणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून पारनेर तालुक्यातील निघोज येथे आज, २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता शरदचंद्रजी पवार अभ्यासिका केंद्र निघोज येथे ‘बालसंस्कार आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर विशेष पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राज्य मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्तात्रय उनवणे आणि राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे यांनी दिली आहे.
अहिल्यानगर येथील सामाजिक संस्था ‘स्नेहालय’ अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ‘उडान’ प्रकल्पाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. निघोज परिसरातील सर्व पत्रकार बांधवांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, बालसंरक्षण कायद्यांविषयी (POCSO आणि इतर) जनजागृती करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून स्नेहालयचे संचालक आणि बालकल्याण समितीचे माजी अध्यक्ष हनिफ शेख उपस्थित राहणार आहेत. बालहक्क आणि कायद्याच्या चौकटीत राहून पत्रकारिता कशी करावी, याबद्दल ते सखोल वैचारिक ज्ञान देतील. तसेच, स्नेहालय उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम हेदेखील याप्रसंगी उपस्थित राहून पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.अनेकदा बालकांशी संबंधित बातम्या देताना अनावधानाने त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्या बालकाच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळी पत्रकारांनी लिखाण करताना कोणती तांत्रिक व कायदेशीर काळजी घ्यावी, बातम्यांमधील शब्दरचना कशी असावी आणि संवेदनशील प्रकरणांत माध्यमांची नेमकी नैतिक जबाबदारी काय आहे, यावर या कार्यशाळेत वैचारिक मंथन होणार आहे.
ग्रामीण भागातील पत्रकारांना कायद्याचे अद्ययावत ज्ञान मिळावे आणि त्यांच्या लेखणीतून बालकांचे हित जोपासले जावे, यासाठी हा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला आहे.
निघोज व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मराठी पत्रकार संघ आणि पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
