पारनेर / भगवान गायकवाड, 
भारतीय सामाजिक क्रांतीचा सुवर्णक्षण असलेल्या ‘महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या’ वर्धापन दिनानिमित्त पारनेर शहरातील युनिटी ऑफ मूलनिवासी समाज, पारनेर तालुका बौद्ध हितवर्धक संघ,राहुलनगर मित्र मंडळ पारनेर तसेच आंबेडकरी चळवळीतील समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.आंबेडकर स्मारक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मूलनिवासी बहुजन समाज पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे, सुनील चौधरी, निलेश गायकवाड, निखिल लव्हाडे ,संजीवन सोनवणे, राजु उघडे, प्रवीण पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.

“शोषितांना मानवी हक्क मिळवून देणारा हा दिवस केवळ इतिहास नसून ती भविष्याची प्रेरणा आहे,” अशी भावना बाळासाहेब पातारे यांनी व्यक्त केली.
यावेळी ‘भारतीय राज्यघटनेचा विजय असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सामूहिक बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पातारे यांनी महाड सत्याग्रहाचे महत्त्व विषद केले. २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळ्याचे पाणी पिऊन बाबासाहेबांनी विषमतेच्या भिंती पाडल्या होत्या. त्याच धर्तीवर आजही समाजात वैचारिक प्रगल्भता आणि बंधुभाव जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितल “चवदार तळ्याचा सत्याग्रह ही केवळ पाणी पिण्याची चळवळ नव्हती, तर तो मानवी गुलामगिरीविरुद्ध पुकारलेला एल्गार होता. पारनेरच्या मातीत हा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन युनिटी ऑफ मूलनिवासी समाजचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र करंदीकर यांनी सांगितले.
 महाड क्रांती दिनाचे महत्त्वाच्या कार्यक्रमास पारनेरमधील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने भीमअनुयायी उपस्थित होते. केवळ एका विशिष्ट समाजाचा कार्यक्रम न राहता, सर्वधर्मीय नागरिकांनी या अभिवादन सोहळ्यात सहभाग नोंदवून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले.शेवटी, उपस्थित सर्वांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून समतेचा आणि न्यायाचा विचार जोपासण्याची शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version