पारनेर – प्रतिनिधी,
तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जागृत ग्रामदैवत माता बनाईदेवी यात्रेत यंदा बैलगाड्यांच्या शर्यतीचा मोठा थरार रंगणार आहे. यात्रा कमिटीने मंगळवार दि. २४ मार्च ते बुधवार २५ मार्च २०२६ या दोन दिवसांत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.

यात्रा कमिटीचे अध्यक्ष संपतराव तराळ, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे, अंकुश पायमोडे, विक्रम झावरे आणि मळिभाऊ रांधवण यांनी याबाबत माहिती दिली. बैलगाडा शर्यतींसाठी एकूण दोन लाख रुपयांपर्यंत आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे.

शर्यतीत प्रथम क्रमांकासाठी ७१ हजार एक रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५१ हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३१ हजार एक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय एक नंबर फायनलसाठी १५ हजार, दोन नंबर फायनलसाठी ११ हजार, तीन नंबर फायनलसाठी ९ हजार, चार नंबर फायनलसाठी ७ हजार, पाच नंबर फायनलसाठी ५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहेत. तसेच घाटाचा राजा स्पर्धेसाठी ५१०० रुपये, शर्यतीतील आकर्षक प्रथम फळीफोड (बारी) गाड्यासाठी ५ हजार रुपये आणि द्वितीय फळीफोडसाठी ३ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ८ वाजता काठी मिरवणूक, रात्री ८ वाजता भव्य छबिना मिरवणूक आणि रात्री १० वाजता अमर पुणेकर प्रस्तुत ‘नटखट सुंदरा’ ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाने चार दिवसीय बनाईदेवी यात्रेची सांगता होणार आहे.

बैलगाडा शर्यतीत जिल्हाभरातील नामवंत बैलजोडी सहभागी होणार असून, प्रेक्षकांना दोन दिवस थरारक अनुभव मिळणार आहे. यात्रा कमिटीने सर्व तयारी पूर्ण केली असून, शर्यती सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version